breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

#RCBvsRR देवदत्तचे शतक, विराटची शानदार खेळी; बंगळुरुचा विजयी ‘चौकार’

मुंबई – आयपीएलच्या मैदानावर रंगलेल्या कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने राजस्थान रॉयल्सवर 10 विकेट्सने धमाकेदार विजय मिळवला. राजस्थानने बंगळुरुला विजयासाठी 178 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान बंगळुरने एकही विकेट न गमावता 16.3 षटकांत पूर्ण केले. बंगळुरुकडून देवदत्त पडीक्कलने सर्वाधिक 101 धावांची नाबाद खेळी केली. तर कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 धावांची अर्धशतकी खेळी केली. बंगळुरुचा या मोसमातील हा सलग चौथा विजय ठरला आहे.

बंगळुरुने यापूर्वी पहिल्या सामन्यात मुंबईला, दुसऱ्या सामन्यात हैदराबादला आणि तिसऱ्या सामन्यात कोलकाताला पराभूत केले आहे. कालच्या विजयासह बंगळुरुचे गुणतालिकेत ८ गुण झाले आहेत. या सामन्यात देवदत्त पडिक्कलने ५२ चेंडूत १०१ धावांची नाबाद खेळी केली. यात ११ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. त्याच्या या खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर विराटने ४७ चेंडूत ७२ धावांची नाबाद खेळी केली. यात ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. विराट कोहलीने आयपीएलमधले ४० वे अर्धशतक ठोकले. या अर्धशतकासह त्याने आयपीएलमध्ये ६००० धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये इतकी धावसंख्या करणारा तो पहिला फलंदाज आहे.

तसेच बंगळुरुकडून गोलंदाजीत मोहम्मद सिराजने चांगली गोलंदाजी करत ४ षटकात २७ धावा देत ३ गडी बाद केले. तर हर्षल पटेलची गोलंदाजी महागडी ठरली. त्याने चार षटकात ४७ धावा देत ३ गडी बाद केले. सध्या हर्षल पटेल पर्पल कॅपचा मानकरी आहे. त्याने या सामन्यात ३ गडी बाद केल्याने आता त्याचे एकूण १२ गडी झाले आहेत. दरम्यान, राजस्थानने हा सामना गमावल्याने राजस्थानचा संघ गुणतालिकेत आठव्या स्थानावर पोहोचला आहे. पंजाब विरुद्धचा सामना राजस्थानने ४ धावांनी गमावला होता, तर चेन्नईने ४५ धावांनी राजस्थानला पराभूत केले होते. दिल्ली विरुद्धचा सामना राजस्थानने ३ गडी आणि दोन चेंडू राखून जिंकला होता. आता राजस्थानचा पुढचा सामना कोलकातासोबत २४ एप्रिलला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button