breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेराजकारण

पुण्यात ‘एमआयएम’ शक्तीप्रदर्शन करणार : भाजपाविरोधी मतांचे विभाजन होणार!

ग्राऊंड रिपोर्ट: लोकसभा निवडणूक रणसंग्राम, महायुतीची ‘मुरली’ सुसाट; धंगेकर, मोरे कोमात!

पुणे । विशेष प्रतिनिधी
‘राज्यात ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन अर्थात ‘एमआयएम’च्या विस्तारावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांत पक्षाची शहरातील ताकद दिसेल,’ असा दावा पुणे लोकसभा मतदारसंघातील ‘एमआयएम’चे उमेदवार अनीस सुंडके यांनी केला आहे. विशेष म्हणजे, सुंडके यांच्या प्रचारासाठी ‘एमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची ७ मे रोजी पुण्यात सभा आयोजित करण्यात आली आहे, असेही त्यांनी नमूद केले. सभेचे ठिकाण मात्र अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. या सभेमुळे भाजपाविरोधी मतांचे विभाजन होईल आणि महायुतीला फायदा होईल, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

सुंडके यांनी पुण्यातील एका अग्रेसर वृत्तपत्राच्या कार्यालयास भेट दिली. त्या वेळी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, की विधानसभा, महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आतापासून काम सुरू केले आहे. पुणे शहरात ‘एमआयएम’चा एक आमदार आणि महापालिकेत ३० नगरसेवक निवडून आणण्याचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने मुस्लिम समाजातील कार्यकर्त्यांशी आतापासून संवाद साधण्यास सुरुवात केली आहे, असेही सुंडके यांनी म्हटले आहे.

पुणे लोकसभा मतदार संघात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून मुरलीधर मोहोळ मैदानात आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उबाठा व घटक पक्ष महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे आमने-सामने आहेत. त्यामुळे ही निवडणूक त्रिशंकू होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर पुण्यातील वातावरण महायुतीच्या बाजुने झुकले होते. त्यानंतर शुक्रवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सभा घेतली. या सभेलाही पुणेकरांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना चुरशीचा होईल, असा दावा केला जातो.

दरम्यान, भाजपा विरोधी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार दिल्यामुळे काँग्रेस तथा महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना फटका बसणार आहे. बहुसंख्य मुस्लीम मतदार हा काँग्रेसला मतदान करण्यास प्राधान्य देतो, असे निरीक्षण आहे. पण, ‘एमआयएम’च्या एन्ट्रीमुळे त्यावर परिणाम होणार आहे. वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांना मानणारा अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय समाज हा मोठ्या प्रमाणात वसंत मोरे यांच्या पारड्यात मतदान टाकाणार आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम काँग्रेसच्या उमेदवारावर होईल, असेही राजकीय जाणकारांचा दावा आहे.

मराठा, धनगर आरक्षणाचा मुद्दा ‘‘बुमरँग’’

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर राज्यातील मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवला जाईल, असा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. मात्र, देशातील आणि राज्यातील राजकारणात ६० वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला हा मुद्दा सोडवता आला नाही. किंबहुना, महाविकास आघाडीची राज्यात सत्ता असताना मराठा-धनगर आरक्षणाचा निर्णय घेत हा विषय ‘क्रेडिट’ करण्याची संधी होती. मात्र, महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार किंवा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत ठाम भूमिका घेतली नाही. यासह मराठा आरक्षणाचे आश्वासन म्हणून ‘ओबीसी’ समाजाला डिवचल्याचा प्रकार आहे. पुणे लोकसभा मतदार संघात ओबीसी समाज निर्णायक आहे. तसेच, अनुसूचित जाती-जमातीच्या मतदारांमध्येही सर्वसाधारण गटातील समाजाला आरक्षण देण्याच्या भूमिकेला अप्रत्यक्ष विरोध आहे.  परिणामी, मराठा आणि धनगर आरक्षणाच्या आश्वासनाचे ‘गाजर’ दाखवण्याचा मुद्दा काँग्रेससाठी ‘बुमरँग’ होण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button