breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमुंबईराजकारण

लोकसभा उमेदवारीसाठी राष्ट्रवादीशी गद्दारी करणाऱ्यांना धडा शिकवा: ज्योती वाघमारे

'... तर उबाठाचे विमानही 'टेक ऑफ' पूर्वीच क्रॅश होईल' : नेरळमध्ये शिवसेनेच्या रणरागिनीने डागली तोफ

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी स्वतःचा पक्ष, स्वतःचा नेता सोडून दुसऱ्या पक्षात पळणारे संजोग वाघेरे हे वाघेरे नाहीत तर ‘भागे रे’ आहेत, या शब्दात शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारावर तोफ डागली.

मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या वतीने नेरळ येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. व्यासपीठावर खासदार बारणे, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, शिवसेनेच्या महिला संपर्कप्रमुख डॉ. शिल्पा देशमुख, कर्जतचे संपर्कप्रमुख विजय पाटील, उपजिल्हाप्रमुख भाई गायकर तसेच दीपक पाटील व शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

प्रा. ज्योती वाघमारे यांनी त्यांच्या भाषणात उबाठा शिवसेना, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस यांच्यावर घणाघाती टीका केली. संजोग वाघेरे यांना बारणे यांच्या विरोधात बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नाही, असे सांगून प्रा. वाघमारे म्हणाले की, लोकसभा तिकिटासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात भागाभाग करणाऱ्या वाघेरे यांना तिकीट देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायला हवी होती. आपल्या पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षाची उमेदवारी मिळवणाऱ्या वाघेरे यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नये. निष्ठा काय असते ते त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व श्रीरंग बारणे यांच्याकडून शिकावे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांशी ते सदैव एकनिष्ठ राहिलेले आहे.

‘उबाठाचे विमानही टेक ऑफ पूर्वी क्रॅश होईल’

उबाठा शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांना नेण्यासाठी आलेल्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघाताचा संदर्भ देऊन प्रा. वाघमारे म्हणाले की, मी सुषमाताईंसाठी दीर्घायुष्य चिंतते, मात्र अंधारलेली विचारसरणी बदलली नाही तर उबाठाचे विमानही असेच ‘टेकऑफ’ पूर्वी ‘क्रॅश’ होईल.

‘त्यांचे सर्व काही आपापल्या मुलांसाठी’

प्रा. वाघमारे यांनी त्यांच्या भाषणात उद्धव ठाकरे यांची ध्वनिफीत ऐकवली. शरद पवार, उद्धव ठाकरे या दोघांनाही आपापल्या मुलांना मुख्यमंत्री बनवायचे आहे. सोनिया गांधी यांना त्यांच्या मुलाला पंतप्रधान बनवायचे आहे. पोटात आहे ते उद्धव ठाकरे यांच्या ओठांवर आले आहे, असा आरोप त्यांनी केला. तुमच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी धनुष्यबाणालाच मतदान करा, असे आवाहन त्यांनी केले.

‘विझलेल्यांनी मशालीला धडा शिकवा’

आपली मुलं संकटात आली की महाविकास आघाडीच्या नेत्यांना संविधान धोक्यात असल्याचा साक्षात्कार होतो, अशी टिप्पणी प्रा. वाघमारे यांनी केली. डॉ. आंबेडकर यांचा सर्वाधिक अपमान काँग्रेसने केला आहे. त्याच काँग्रेसला मते द्या, असे उद्धव ठाकरे सांगत आहेत. अशा या विझलेल्या मशालीला आंबेडकरी जनतेने धडा शिकवावा, असे आवाहनही त्यांनी केले.

नाक कापलं गेलेला राजा आणि माकड

झोपलेल्या राजाच्या नाकावर बसलेली माशी मारण्यासाठी तलवारीने राजाचे नाक कापणाऱ्या माकडाची गोष्ट सांगत प्रा. वाघमारे यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. नक कापलं गेलं तरी राजा अजूनही त्याच माकडाच्या सल्ल्याने कारभार करीत आहे, या शब्दांत त्यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची खिल्ली उडवली. प्रजा संकटात असताना मदतीला धावून जाण्याऐवजी राजा फेसबुक लाईव्ह मध्येच मग्न होता, असा शेराही त्यांनी मारला.

प्रा. वाघमारे यांनी शाब्दिक कोट्या करीत बारणे यांचे कौतुक केले. ‘विकासकामांसाठी देत नाहीत कारणे, त्यांचे नाव आहे खासदार श्रीरंग बारणे’ असे यमक जुळवत त्यांनी टाळ्या मिळवल्या. बारणे यांच्या ‘आप्पा’ या टोपणनावाची त्यांनी फोड केली. ‘आ’ म्हणजे आईचे प्रेम आणि ‘प्पा’ म्हणजे पप्पांचा धाक, असे हे व्यक्तिमत्त्व आहे, असे त्या म्हणाल्या.

ही तर काळ्या दगडावरची रेघ

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार ही काळा दगडावरची रेघ आहे, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला. भारताला गतिमान ठेवण्यासाठी, मोदी पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी मतदारांनी धनुष्यबाणाला मतदान करावे, असे आवाहन बारणे यांनी केले. मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांची माहिती बारणे यांनी यावेळी दिली.

कर्जत-खालापूरला मिळाला सर्वाधिक निधी – थोरवे

गेल्या साडेचार वर्षात कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाला सर्वाधिक विकास निधी मिळाल्याचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले. खासदार बारणे यांच्या सहकार्यामुळे गेल्या साडेचार वर्षात आपल्या मतदारसंघाला केंद्र व राज्य शासनाकडून तब्बल 900 ते 1000 कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघातून खासदार बारणे यांना एक लाखांहून अधिक मताधिक्य मिळवून देऊ, अशी ग्वाही संतोष भोईर यांनी दिली. नेरळ व कडाव येथील कार्यकर्त्यांनी या सभेत मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला. खासदार बारणे व आमदार थोरवे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button