breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

रॉयल्सच्या द्वंद्वयुद्धात आरसीबीच ठरली भारी

दुबई -आयपीएलमध्ये आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर ( Rajasthan vs Bangalore ) यांच्यातील सामना रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ७ गडी राखून जिंकत आपली गुणसंख्या १४ पर्यंत नेली. राजस्थानने ठेवलेल्या १५० धावांचे आव्हान आरसीबीने १७.१ षटकात ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. रॉयल चॅलेंजर बेंगलोरकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक ५० धावा केल्या. त्याला श्रीकार भारतने ४४ धावांची खेळी करुन चांगली साथ दिली.

राजस्थान रॉयल्सच्या १५० धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या आरसीबीच्या सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी ४८ धावांची सलामी दिली. मात्र पॉवर प्लेच्या अखेरच्या षटकात मुस्तफिजूरने देवदत्त पडिक्कलचा २२ धावांवर त्रिफळा उडवत आरसीबीला पहिला धक्का दिला.

त्यानंतर पुढच्याच षटकात रियान परागने विराट कोहलीला २५ धावांवर धावबाद करत आरसीबीचा दुसराही सलामीवीर माघारी धाडला. दोन्ही सलामीवीर माघारी गेल्यानंतर श्रीकार भारत आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी संघाला शतक पार करुन दिले.

६७ धावांची भागीदारी करणारी ही जोडी आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब करणार असे वाटत असतानाच मुस्तफिजूरने भारतला ४४ धावांवर बाद केले. भारत बाद झाल्यानंतर मॅक्सवेलने आपले अर्धशतक पूर्ण करत आरसीबीला विजयाच्या जवळ आणून ठेवले. अखेर डिव्हिलियर्सने आपल्या इनिंगच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारत सामना खिशात टाकला.

तत्पूर्वी. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंगलोर ( Rajasthan vs Bangalore ) यांच्यातील सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने पॉवर प्लेमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत ५६ धावा केल्या. यात सलामीवीर एव्हिन लुईसच्या २१ चेंडूत केलेल्या ४१ धावांचे मोठे योगदान होते. दुसऱ्या बाजूने यशस्वी जयस्वालने १५ चेंडूत १५ धावा करत सावध साथ दिली.

पॉवर प्लेनंतर जयस्वालने आपली धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. यामुळे राजस्थानची धावसंख्या झपाट्याने वाढली. राजस्थानने ८ षटकात सत्तरी पार केली. मात्र ख्रिस्तियनने ही जोडी फोडली. त्याने २२ चेंडूत ३१ धावा करणाऱ्या यशस्वी जयस्वालला बाद केले. जयस्वाल बाद झाल्यानंतर लईसने आपले अर्धशतक पूर्ण केले.

पदार्पण करणाऱ्या गार्टनचा राजस्थानला मोठा धक्का ( Rajasthan vs Bangalore )
आता एव्हिन लुईसच्या साथीला कर्णधार संजू सॅमसन आला होता. या दोघांनी ११ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. मात्र त्यानंतर लगेचच लुईस पदार्पण करणाऱ्या जॉर्ड गार्टनच्या गोलंदाजीवर ५८ धावा करुन बाद झाला. लुईस बाद झाल्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली.

त्याने आक्रमक फटके मारत आरसीबीच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या जोडीला आलेला महिपाल लोमरोरने निराशा केली. तो यझुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर ३ धावा करुन बाद झाला. त्यानंतर ड्रिंक्स ब्रेकनंतर शहाबाजने धोकादायक वाटणाऱ्या संजूला १९ धावांवर बाद करुन राजस्थानला मोठा धक्का दिला.

सॅमसननंतर राजस्थानची गळती 
संजू बाद झाल्यानंतर राहुल तेवातियाही घाई गडबडीत शाहबादच्याच गोलंदाजीवर पडिक्कलकडे झेल देऊन परतला. त्याने अवघ्या २ धावांची भर घातली. १५ षटकांच्या आतच राजस्थानचा निम्मा संघ बाद झाल्यानंतर डाव पुढे नेण्याची जबाबदारी लिव्हिंगस्टोन आणि रियान पराग यांच्यावर आली.

मात्र चहलने लिव्हिंगस्टोनला ६ धावांवर बाद करत राजस्थानला सहावा धक्का दिला. मोक्याच्या षटकात पाठोपाठ विकेट गेल्याने राजस्थानची चांगली धावगती मंदावली. मॉरिसने काही फटेक मारत संघाला १५० च्या जवळ पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हर्षल पटेलने रियान पराग बाद करुन अजून एक धक्का दिला. त्यानंतर हर्षल पटेलने पुढच्याच चेंडूवर ख्रिस मॉरिसला ( १४ ) बाद केले.

हर्षल पटेलला हॅट्ट्रिक साधता आली नाही मात्र त्याने त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चेतन साकरियाला ( २ ) बाद करत राजस्थानला १४९ धावांपर्यंत थोपवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button