Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

विदर्भाला पुराला वेढा; ‘या’ जिल्ह्यांना धोका कायम तर चौदा गावात रेड अलर्ट जारी

हिंगणघाट, वणी, वरोरा, अमरावती तालुक्यांमध्ये बचावकार्य सुरू

 यवतमाळ |  विदर्भातील वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टीने नदी-नाल्यांना पूर आला आहे. मंगळवारी हिंगणघाट, वणी, वरोरा आणि अमरावती तालुक्यातील काही गावांमध्ये पुराचा वेढा कायम होता. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील उकनी, जुनाड, शिवणी, शेलू, भुस्की, कवडशी, रांगणा, चिंचाली, सावंगी, झोला, कोना या ११ गावांना पुराचा वेढा आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या तीन टीम नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम करीत आहे. झोला व कोना येथील एक हजार नागरिकांना त्यांच्या पशुधनासह वणी येथील आयटीआय येथे स्थलांतरित करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल येगडे यांनी मदत कार्याची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. वणी तालुक्यातील चौदा गावात प्रशासनाने ‘रेड अलर्ट’ घोषित केला आहे. पाटाळ्याचा पुल पाण्याखाली आल्याने वणी-वरोरा वाहतूक बंद आहे. वर्धा व पैनगंगा नदीकाठावरील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गावात पाणी शिरले आहे. वणीचे तहसीलदार निखिल धुळधर यांच्या नेतृत्वात तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती मदत व बचाव कार्य करीत आहे. आतापर्यंत राळेगाव तालुक्यातील एक हजार ९०, मारेगाव तालुक्यातील ४५ , कळंब तालुक्यातील ९१ बाभुळगाव तालुक्यातील २१ वणी तालुक्यातील एक हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील सोईट येथील १३२ नागरिकांना एसडीआरएफच्या चमूने सुखरूपरित्या गावाबाहेर हलविले आहे. गावात अतिवृष्टीने पाणी येण्याची शक्यता बघता प्रशासनाने सदर पाऊल उचलले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तालुक्यातीलच करंजी येथे अडकलेले १२ गावकऱ्यांना नावेच्या मदतीने बाहेर काढले आहे. करंजी मधील २५० गावकऱ्यांना वरोरा येथील साई मंगल कार्यलयात हलविण्यात आले.

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्याला पुराचा वेढा आहे. पुरामुळे ६१ गावे बाधित आहे. सावंगी हेटी येथे चार नागरिक सोमवारी रात्रीपासून पाण्यात अडकले होते. मंगळवारी एनडीआरएफ चमू सावंगी हेटी येथे दाखल झाली. दोन लहान मुले, एक महिला आणि एक पुरुष यांना बाहेर काढण्यात आले आहे. हिंगणघाट शहरात शेकडो घरे अतिवृष्टीने बाधित झाली. घरातील भांडे आणि खाण्याचे पदार्थ देखील वाहून गेल्याने खायचे काय असाच प्रश्न नागरिकांसमोर आहे. अमरावती तालुक्यातील सावरखेड गावात पुराचे पाणी शिरल्याने गावकऱ्यांचे नुकसान झाले. सोमवारी पोरगव्हाणा गावात पुराचे पाणी शिरल्याने तेथील ५० कुटुंबांना स्थलांतरीत करण्यात आले.

– झोला व कोना येथील नागरिकांना वणी येथील आयटीआय येथे स्थलांतरित केले.

– वरोरा तालुक्यातील सोईट येथील एका महिलेला एसडीआरएफच्या चमूने सुखरुप बाहेर काढले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button