breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांना झळ, महाबीजचे बियाणे महागले; सोयाबीनच्या दरात दुपटीने वाढ

अकोला : यंदाच्या खरीप हंगामात महाबीजने सोयाबीन बियाण्यांचे दर जवळपास दुपटीने वाढविले आहे. १३० ते १४५ रुपये प्रति किलो अशी ही दरवाढ आहे. मागील वर्षी सोयाबीनची ३० किलोची बॅग साधारणपणे २२५० रुपयांपर्यंत मिळत होती. यंदा तीच बॅग ३९०० ते ४३५० रुपयांना घ्यावी लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांना सर्वच बाबतीत महागाईला सामोरे जावे लागत आहे. आधीच रासायनिक खतांची भरमसाठ दरवाढ, डिझेल पेट्रोल महागल्याने मशागतीचा वाढलेला खर्च, आणि आता महाबीजचे बियाणेही अपेक्षेपेक्षा जास्त महाग झाले आहे. महाबीज प्रशासनाने नुकतेच त्यांचे दर जाहीर केले. त्यात प्रामुख्याने सोयाबीन या वानाचे दर बघितले असता गेल्या हंगामाच्या तुलनेत जवळपास दुप्पट वाढ केल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गेल्या हंगामात काढणी दरम्यान झालेल्या पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले होते. त्यामुळे अपेक्षित कच्चे बियाणे पाहिजे त्या प्रमाणात मिळाले नाही. बियाणे मिळवण्यासाठी उन्हाळी सोयाबीन लागवडीचा प्रयोग केला गेला. मात्र अतिउष्णतेमुळे या वर्षी उन्हाळी हंगामातूनही अपेक्षित सोयाबीन बियाणे मिळू शकलेले नाही. परिणामी मागणीच्या तुलनेत महाबीज सोयाबीन बियाण्यांचा पुरवठा कमीच राहणार आहे. शिवाय बाहेरून बियाणे खरेदी न करण्याबाबत शासनाने महाबीजला आधीच सुचवलेले असल्याने उपलब्ध असलेल्या बियाण्यांवरच त्यांना संपूर्ण हंगामात शेतकऱ्यांना बियाणे पुरवावे लागणार आहे.

महाबीज हे भागधारकांकडून बिजोत्पादन करून घेते. डिसेंबर-जानेवारीमध्ये बाजार समितीत सोयाबीनला जे दर मिळतात त्यावर काही टक्के बोनस देऊन कच्चे बियाणे विकत घेतले जाते. या बियांवर प्रक्रिया, त्याची पॅकिंग, ग्राहकांपर्यंतची वाहतूक, विक्रीतील नफा व इतर खर्च गृहीत धरून बियाण्यांचा भाव निश्चित होत असतो. यंदा डिसेंबर-जानेवारीत सोयाबीन महागले होते. त्यामुळे भागधारकांना त्या कालावधीचा दर दिला जाणार आहे. तसेही सोयाबीन काही महिन्यांपासून महाग विकल्या जात असल्याने त्याचा परिणाम आता बियाण्यांच्या दरावर दिसून येत आहे.

खाजगी कंपन्याही वाढवणार दर

प्रत्येक हंगामात बहुतांश कंपन्यांचे दर महाबीज बियाण्यांच्या दरावर ठरवले जातात. महाबीजनेच यंदा दर वाढल्याने आता खाजगी कंपन्यांचे दर सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढतील अशी शक्यता निर्माण झाली आहे. बाजारात सोयाबीन बियाणे दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. पाऊस वेळेपूर्वीच दाखल झाला तर बियाणे खरेदीसाठी गर्दी वाढू शकते. महाबीजच्या वाढीव दराचा फायदा आता खाजगी कंपन्यासुद्धा घेऊ शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button