ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

तुम्ही कफनचोर आहात. तुमच्या घोटाळ्याची मालिका मी बाहेर काढणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंना इशारा, बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटले असेल?

मुंबई : महापालिकेतील घोटाळ्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ‘प्रेताच्या टाळूवरील लोणी चोरणारे तुम्ही कफनचोर आहात. तुमच्या घोटाळ्याची मालिका मी बाहेर काढणार,’ असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी उद्धव ठाकरे यांना दिला. ‘हे अध्यक्ष आहेत की गल्लीतील नेते, हे समजत नाही. आम्ही संयमी, शांत आहोत. पण आम्हाला ‘ईट का जबाब पत्थर से’ देता येतो,’ असे म्हणत फडणवीस यांनी मुंबईत प्रचाराचे रणशिंग फुंकले. मुंबईतील महायुतीच्या सहाही उमेदवारांच्या विजयाचा निर्धार त्यांनी त्यांनी व्यक्त केला.‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले होते की, काँग्रेससोबत जाण्याची वेळ येईल, तेव्हा शिवसेनेचे दुकान बंद करील. पण आता उद्धव म्हणतात, वर्षाताई, मी पंजाचे बटण दाबून मी काँग्रेसला मतदान करेन. तेव्हा बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटले असेल,?’ असा सवाल फडणवीस यांनी केला.

भाजपतर्फे दादर येथील कामगार मैदानात बुधवारी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार, उत्तर मुंबईचे भाजप उमेदवार पीयूष गोयल, उत्तर पूर्व मुंबईचे मिहीर कोटेचा, उत्तर मध्य मुंबईचे उज्ज्वल निकम, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, प्रवीण दरेकर यांच्यासह पक्षाचे नेते उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढवला. ‘ बाळासाहेबांचे नाव घ्यायचे आणि त्यांच्या विचारांशी प्रतारणा करायची. बाळासाहेबांच्या संपत्तीचे मालक उद्धव, आदित्य ठाकरे असतील, पण विचारांचे मालक एकनाथ शिंदे आहेत. त्यांचे विचार, हिंदुत्व जिवंत ठेवण्याचे काम शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेने केले आहे,’ असे फडणवीस म्हणाले. नरेंद्र मोदी नसते, तर मुंबईत महत्त्वाकांक्षी प्रकल्प आले नसते, असे ते म्हणाले. ‘पंचवीस वर्षे मुंबई महापालिका हवी तशी चालवली, मुंबईला काय दिले? मुंबईतील गिरणी कामगारांना तुम्ही हद्दपार केले. ७० हजार कोटी बँक ठेवींमध्ये टाकले, पण गिरणी कामगारांना घरे दिली नाहीत,’ अशी टीका फडणवीस यांनी केली.

‘करोनाकाळात विकसित राष्ट्रांचा लस घेण्यासाठी आपल्यावर दबाव होता. तो मोदींनी झुगारला. पूर्वी ३० वर्षे भारताला लस मिळत नव्हती. लसनिर्मिती करू शकणाऱ्या तीन ते चार देशांमध्ये आज भारत आहे. मोदींच्या नेतृत्वात ती तयार झाली. उद्धवजी, तुमको मिरची लगी तो मै क्या करू? त्या काळात तुम्ही खिचडी, कफनचोरी करत होतात,’ असे टीकास्त्र फडणवीस यांनी सोडले.

‘या निवडणुकीच्या निमित्ताने विकसित भारताची निर्मिती करत आहोत. मुंबईत काँक्रीटचे रस्ते तयार झाले असून ५० वर्षे त्याकडे पाहण्याची गरज नाही. मुंबई खड्डेमुक्त झाली आहे. जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत, तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची असेल. हे लबाड लांडगे निवडणूक आली की, कोल्हेकुई सुरू करतात,’ असे टीकास्त्र त्यांनी सोडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button