स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार ? उद्याच्या सुनावणीकडे राज्याचे लक्ष

पुणे : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीबाबतची सुनावणी उद्या (मंगळवार, दि. 4) रोजी घ्यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील आणि सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर न्यायालयाने सकारात्मक भूमिका घेतली असून, उद्या ही सुनावणी होणार आहे. ही याचिका दहाव्या क्रमांकावर असल्याने त्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
मागील आठवड्यात २५ फेब्रुवारी रोजी ही सुनावणी होणार होती. ही याचिका सुनावणीच्या २९ व्या क्रमांकावर होती. मात्र, न्यायालयाचे कामकाज दुपारी १ पर्यंतच झाल्याने ८ व्या क्रमांकांपर्यंतच्या याचिका न्यायालयाकडून ऐकण्यात आल्या. त्यानंतर कामकाज संपताना याचिकाकर्त्यांचे वकील आणि सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी ४ मार्च ही तारीख मागितली. कोर्टाने त्यावर विचार करू, असे म्हटले होते. त्यानुसार दहाव्या क्रमांकावर ही याचिका आहे. या याचिकेत माजी विरोधीपक्ष नेते उज्ज्वल केसकर यांनी दाखल केलेली याचिकाही असून, केसकर यांचे वकील ऍड. श्रीरंग वर्मा यांनी ही माहिती दिली असल्याचे केसकर यांनी सांगितले.
राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन महिन्यांपूर्वी शासन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत गंभीर असून, एप्रिल अथवा मे महिन्यात या निवडणुका होण्यासाठी शासन न्यायालयास विनंती करणार असल्याचे सूतेवाच केले होते. त्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुकांनी मागील तीन महिने जोरदार तयारी सुरू केली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील, हे आता एआय पण सांगू शकत नाही, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे निवडणुका आणखी लांबणीवर पडतील, असे वातावरण तयार झाले होते. मात्र, पुन्हा सुनावणीची तारीख मिळाल्याने राज्यभरात उत्सुकता वाढली आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा