मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! ३० मे पासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण

Manoj Jarange Patil | मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत थेट सरकारलाच आव्हान दिले आहे. मराठा-कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून सरकारला खडेबोल सुनावत त्यांनी आगामी ३० मे पासून अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याची मोठी घोषणा केली आहे. या आंदोलनात पुन्हा एकदा ३ कोटी मराठे एकत्र येतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
उपोषणाला बसण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे एका महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. “आम्ही गेल्या अडीच-तीन वर्षांपासून प्रामाणिकपणे लढत आहोत, पण समाजाच्या पदरात काय पडले? जून महिन्यात मुलांचे ॲडमिशन आहेत. ५८ लाख कुणबी नोंदी सापडूनही सरकार मराठा समाजाला मोठे होऊ देत नाही, हीच सरकारची भूमिका आहे. भाजपमधील मराठा नेत्यांच्या लेकीबाळींना आरक्षणाची गरज नाही का? आपल्या समाजाचा एवढा द्वेष का केला जात आहे?” असा सवाल जरांगे यांनी केला.
हेही वाचा
नवी सांगवी येथे ३ अनधिकृत आर. सी. सी. बांधकामांवर निष्कासन कारवाई
“प्रमाणपत्र रोखण्याला फडणवीस साहेबच जबाबदार”
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. “आता आंदोलन असे करायचे की फडणवीसांना चारी दिशांना केवळ मराठेच दिसले पाहिजेत. फडणवीसांनी विधानसभेत म्हटले होते की मंत्र्यांना किंमत नाही, मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा आहेत; याचाच अर्थ असा की फडणवीस साहेबांनीच मराठ्यांचे प्रमाणपत्र रोखून धरले आहे. अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला देखील तेच जबाबदार आहेत. तुम्हाला मराठ्यांनीच मंत्री केले आहे हे विसरू नका,” असा थेट इशारा त्यांनी दिला.





