‘खेळण्याची भूक अजूनही कायम..’; वनडे वर्ल्डकप खेळण्याबाबत विराट कोहलीचे मोठे वक्तव्य

Virat Kohli | भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने २०२७ च्या वनडे वर्ल्डकपमध्ये खेळण्याबाबत एक अत्यंत महत्त्वाचे आणि रोखठोक वक्तव्य केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या (RCB) सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओ मुलाखतीत त्याने हे भाष्य केले आहे. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली आता केवळ वनडे क्रिकेट खेळत असून, आगामी वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर तो सध्या दिल्लीकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहे.
होस्ट मयंती लंगरने घेतलेल्या या मुलाखतीत विराटने आपल्या भविष्यातील योजनांबद्दल स्पष्टपणे मत मांडले. विराट म्हणाला, “माझा दृष्टिकोन अगदी स्पष्ट आहे. मी ज्या संघाचा भाग आहे, तिथे जर मी माझे योगदान देऊ शकत असेन आणि व्यवस्थापनालाही माझे योगदान महत्त्वाचे वाटत असेल, तर नक्कीच मला योग्य ओळख मिळेल. मात्र, जर मला माझी पात्रता आणि महत्त्व सिद्ध करण्यासाठी वारंवार भाग पाडले जात असेल, तर मी त्या परिस्थितीत राहू इच्छित नाही. कारण मी माझ्या तयारीबाबत पूर्णपणे प्रामाणिक आहे.”
हेही वाचा
रावेत येथील एजे फर्निचर मॉलवर लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सकडून गोळीबार!
आपल्यातील क्रिकेटच्या भुकेबद्दल बोलताना विराट पुढे म्हणाला, “अर्थातच मला खेळणे सुरू ठेवायला आवडेल. मला कोणालाही काहीही सिद्ध करायचे नाही, तर या खेळातील माझी भूक अजूनही कायम आहे. वर्ल्डकपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे ही एक अद्भूत आणि विलक्षण गोष्ट आहे. देशासाठी खेळण्याची संधी मिळणे ही माझ्यासाठी नेहमीच अभिमानाची बाब राहिली आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी इतरांहून कमी नाही, तर त्यांच्याहून अधिक जास्त मेहनत घेतो. जर तुम्हाला वाटत असेल की, वनडे सामन्यातील ४० षटकं मी सलग चौकार- षटकार मारु, तर मी ते करु शकतो. कारण माझी तयारीच तशी आहे.”
विराट कोहलीची वनडे कारकीर्द
सध्या केवळ वनडे क्रिकेट खेळणाऱ्या विराट कोहलीच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठे विक्रम आहेत. त्याने आतापर्यंत ३११ वनडे सामन्यांमध्ये ५८.७१ च्या उत्कृष्ट सरासरीने १४,७१७ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम विराट कोहलीच्याच नावावर आहे. त्याने आतापर्यंत ५४ शतके आणि ७७ अर्धशतके झळकावली आहेत. २०२७ चा वनडे वर्ल्डकप हा विराट कोहली आणि रोहित शर्माचा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात रंगत असतानाच विराटने केलेल्या या विधानाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.





