निगडीत मिनी ऑलिम्पिक धर्तीवर साकारणार क्रीडा संकुल

रावेत : निगडी प्राधिकरणातील सेक्टर २५ येथील मदनलाल धिंग्रा मैदानाचे रुप पालटणार आहे. महापालिका विविध खेळांसाठी या मैदानात नवीन क्रीडा संकुल उभे करणार आहे. त्यामुळे अत्याधुनिक सुविधायुक्त मिनी ऑलिम्पिक धर्तीवर हे क्रीडा संकुल हौशी, उदयोन्मुख व स्पर्धक खेळाडूंसाठी दिलासा ठरणार आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या मैदानात तीन बॅडमिंटन कोर्ट आहेत. तसेच जॉगिंग ट्रॅक आणि मोकळे खेळाचे मैदान, असे एकूण मैदानाचे क्षेत्रफळ ५.४ एकर आहे. सकाळी व संध्याकाळी नागरीक व्यायामासाठी तसेच खेळाडू या मैदानावर सरावासाठी येत असतात. तसेच क्रिकेटचे सामनेही येथे भरविण्यात येतात. हे नवीन क्रीडा संकुल बांधण्याचा खर्च अंदाजे २३ कोटी ४० लाख रुपये असणार आहे. दोन वर्षात काम पूर्ण करण्याची महापालिका प्रशासनाची अट आहे.
हेही वाचा – फास्ट ट्रक कोर्टात केस चालवून आरोपीला चौकात फाशी दिली पाहिजे; सुप्रिया सुळेंचा संताप
तीन मजली नवीन इमारत, पार्किंग व लिफ्ट सुविधा (२१८ चौ. मी) असणार आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सेमी ऑलिम्पिक आकाराचा अत्याधुनिक सात लेनचा डेकसह जलतरण तलाव तयार करण्यात येणार आहे. कार्यालय, क्रीडा वैद्यकीय केंद्र, कोच रूम, कॉन्फरन्स हॉल तसेच प्रसाधनगृह, खेळाडूसाठी चेंजिंग रूम असणार आहे. इमारतीच्या बाजूला मैदानात बॉक्स क्रिकेट, पिकेल बॉल व व्हॉलिबॉलसाठी मैदानाची निर्मिती करण्यात येणार आहे.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा
विविध खेळाच्या आधुनिक सुविधांसह मदनलाल धिंग्रा मैदानातील नवीन क्रीडा संकुलाची निविदा प्रक्रिया सुरू असून लवकरच कामास सुरुवात होणार आहे. क्रीडा संकुलाचे काम सुरु असताना मैदान नागरिकांसाठी खुले राहणार आहे.
– मनोज सेठिया,सह शहर अभियंता, स्थापत्य -उद्यान क्रीडा, महापालिका