अमेरिकेत ऑस्कर अवॉर्ड शो दरम्यान ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप
भूकंपाचा केंद्रबिंदू डॉल्बी थिएटरपासून काही अंतरावर

आंतरराष्ट्रीय : जगभरातील कलाकार हे ऑस्कर सोहळा साजरा करण्यासाठी अमेरिकेतील हॉलिवूडच्या रेड कार्पेटवर जमा झाले होते. तेवढ्यात अचानक जमीन हादरू लागली, स्फोटाचा आवाज येऊ लागला. अमेरिकेत ऑस्कर अवॉर्ड शो सुरू असताना ३.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपाचे केंद्र उत्तर हॉलीवूडमध्ये होते. ऑस्कर पुरस्कार सोहळा डॉल्बी थिएटरमध्ये आयोजित करण्यात आला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू घटनास्थळापासून अवघ्या काही अंतरावर होता. स्थानिक वेळेनुसार रविवारी रात्री १० वाजता भूकंप झाला. ऑस्कर अवॉर्ड्सच्या आफ्टर पार्टीसाठी सेलिब्रेटी एकत्र येत असतानाच हा भूकंप झाला.
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर आफ्टर पार्टीसाठी जमा झालेल्या सर्व कलाकारांना भूकंपाचे धक्के जाणवू लागले होते. लोकांनी आरडाओरड सुरु केली होती. काहींनी तेथील इमारतीला बसलेले हादरे पाहिले. यूएस जिऑलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) ने सांगितले की संपूर्ण लॉस एंजेलिसमध्ये अनेक मैलांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तिव्रता कमी असल्यामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला नव्हता. लोकांचे नुकसान किंवा दुखापत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लॉस एंजेलिसच्या अग्निशमन विभागाने सांगितले की, संपूर्ण लॉस एंजेलिसच्या डाउनटाउनमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
हेही वाचा : ‘विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क’; संजय राऊत यांचं विधान
भूकंपाची तिव्रता जास्त असती तर इमारतींचे आणि माणसांचे मोठे नुकसान झाले असते. बीबीसीच्या अहवालानुसार, मार्चच्या सुरुवातीपासून दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये झालेल्या सुमारे ४० भूकंपांपैकी हा एक आहे. USGS डेटानुसार, त्यापैकी बहुतेक भूकंपांची तिव्रता ही १ रिश्टर स्केल होती. त्यामुळे लोकांना ते जाणावले नाहीत. गेल्या महिन्यात जवळच्या मालिबू भागात ३.७ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. डिसेंबरमध्ये नॉर्दर्न कॅलिफोर्नियामध्ये ७ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप झाला, त्यानंतर किनारी भागातील लोकांना भूकंपाचा इशारा देण्यात आला.
बीबीसीच्या रिपोर्टमध्ये काही लोकांनी बॉम्बचा स्फोट झाल्यासारखा धक्का बसतो तसा धक्का बसल्याचे म्हटले आहे. एका स्थानिक रहिवाशाने सांगितले की, त्याला आतापर्यंतचा सर्वात तीव्र भूकंप जाणवला. मात्र, हा धक्का केवळ ३.९ रिश्टर स्केलचा होता हे ऐकून तो चकीत झाला.