लोणावळ्यातील भुशी धरण्यात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू

लोणावळा : लोणावळ्यातील पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असलेल्या भुशी धरण्यात मित्रांसोबत पर्यटन व वर्षाविहासाठी आलेल्या उत्तर प्रदेश येथील दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. हि घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे गतवर्षी या परिसरात घडलेल्या मोठ्या दुर्घटनेच्या अंगावर काटा उभा राहणाऱ्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. पर्यटकांच्या बेफिकीरीमुळे घडणाऱ्या अशा घटनांमुळे भुशी धरणासह येथील पर्यटनस्थळे नाहक बदनाम होत आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पर्यटक व नागरीकांनी स्वतःच्या अतिउत्सासह बेफिकीरीवर अंकुश ठेवण्याची गरज आहे.
जमाल (वय- २२, रा. विजयपूर, मिर्झापूर, उत्तरप्रदेश),साहिल असरफ अली शेख वय-१९, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. थेरगाव, पुणे ) अशी भुशी धरण्याच्या बॅक वॉटर येथे बुडून मृत्यू झालेल्या दोन्ही पर्यटकांची नावे आहेत.लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जमाल आणि साहिल हे दोघे त्यांच्या काही मित्रांबरोबर सकाळी पर्यटन व वर्षाविहासाठी लोणावळ्यात आले होते. दुपारी ते पर्यटकांचे सर्वाधिक आकर्षण असलेल्या भुशी धरणाकडे फिरायला गेले आणि ते धरणाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बॅक वॉटर येथे पोहण्यासाठी उतरले. यावेळी साहिल आणि जमाल यांना येथील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते दोघे पाण्यात बुडाले. ते बुडू लागल्याचे लक्षात येताच त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केला. आरडाओरडा ऐकून भुशी धरणाच्या पायऱ्या परिसरात सुरक्षासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी व काही स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र तेथेपर्यंत जाईपर्यंत ते दोघे तेथील खोल पाण्यात बुडाले होते.
हेही वाचा – भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
पोलिस व त्यांच्या मित्रांसह स्थानिकांनी या घटनेची माहिती लोणावळा शहर पोलीस व शिवदुर्ग मित्र आपत्कालीन पथकाला कळवली.घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप व काही पोलिस कर्मचारी तसेच शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकाने पाण्यात उतरून शोध मोहीम हाती घेतली. शिवदुर्ग मित्रच्या आपत्कालीन पथकातील महेश मसणे, सचिन गायकवाड सर, कपिल दळवी, योगेश दळवी, दुर्वेश साठे, कुणाल कडू,हर्षल चौधरी, नीरज आवंढे, अशोक उंबरे, पिंटू मानकर, साहेबराव चव्हाण, शाम वाल्मीक, महादेव भवर, राजेंद्र कडू व अनिल आंद्रे यांना अवघ्या दिड तासांत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करीत आहेत.