‘युक्रेन’ च्या युद्धतंत्राचा पासवर्ड : स्पायडर वेब !

रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्ध दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालले आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की हे दोघेही सूडाने अक्षरशः पेटले असून युद्धाचा शेवट फार भयानक होणार, असे स्पष्ट चित्र आहे. युक्रेनने रशियावर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला चढवला. यामध्ये रशियाचे प्रचंड नुकसान झाले असून युक्रेनच्या आत्मघाती ड्रोन्सनी रशियाच्या वायुदलाची ४१ लढाऊ विमाने नष्ट केली, किंबहुना, त्यांचा कोळसा केला. यातील एका विमानाची किंमत साधारण तीन हजार कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यावेळी युक्रेनने वापरलेल्या अत्याधुनिक युद्धतंत्राने संपूर्ण जग अवाक् झाले आहे, हे नक्की ! काय आहे हे अत्याधुनिक युद्धतंत्र ? त्याचा पासवर्ड आहे..स्पायडर वेब !
रशियाची ४१ विमाने बेचिराख..
रशियाची ४१ विमाने, त्यांचे विमानतळ आणि क्रूझ क्षेपणास्त्रे बेचिराख करण्यासाठी युक्रेनने जे तंत्र वापरले ते म्हणजे ‘स्पायडर वेब’ ! आणि हीच तर आता बदलत्या युद्धतंत्राची नांदी म्हणावी लागेल ! युक्रेनने रशियाच्या हद्दीत तब्बल ४००० किलोमीटर आत घुसून गेल्या आठवड्यात केलेल्या ड्रोन हल्ल्यांनी, पारंपारिक युद्धतंत्र कालबाह्य ठरून नव्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित युद्धतंत्राचा वापर यशस्वी झाल्याने आता संपूर्ण युद्धतंत्रच पुनर्मांडणीच्या उंबरठ्यावर असल्याची जाणीव जगाला झाली आहे. युक्रेनच्या या नवीन युद्धतंत्रामुळे संपूर्ण जगच आश्चर्यचकीत झाले आहे. यापुढे युद्धनीती आणि कूटनीती कशी वापरायची याचे ठोकताळेच बदलले, तर आश्चर्य वाटून देऊ नका !
युक्रेनने काय केले ?
युक्रेनने अनेक ट्रक्समधे लाकडी खोक्यांमधे ठेवलेले ड्रोन्स रशियाच्या हद्दीत, त्यांच्या लष्करी तळांच्या जवळपास नेऊन उभे केले. ‘रिमोट कंट्रोल’ ने ट्रकचे छत आणि लाकडी खोक्यांची झाकणे उघडून ड्रोन अचूक लक्ष्यभेद करतील, याची त्यात बसवलेल्या कॅमेऱ्यातील चित्रिकरण पाहत खात्री करून रशियाची थोडी थोडकी नव्हे तर ४१ विमाने जमिनीवरच नष्ट केली, या महागड्या विमानांचा कोळसा बघत बसण्या पलीकडे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या हातात काहीच राहिले नाही !
हेही वाचा – भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने विजय मिळवला; नाना पटोलेंचा गंभीर आरोप
युक्रेनचे दीड वर्षे काटेकोर नियोजन..
प्रचंड गोपनीयता पाळून गेले दीड वर्षे अत्यंत काटेकोर नियोजन करीत युक्रेनने रशियन हद्दीत खोलवर शिरून अचानक केलेल्या या ड्रोन हल्ल्यात रशियाचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा युक्रेनने केला असून तो खरा असल्याची जगाची खात्री झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. त्या धक्क्यातून अनेक देश अजूनही सावरले नाहीत.
युक्रेनचा अत्यंत विध्वंसक हल्ला
या अत्यंत विध्वंसक हल्ल्यात युक्रेनने वापरलेल्या ड्रोन्सची संख्या फक्त १२४ असल्याचे समजते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे ड्रोन्स तयार करायला प्रत्येकी फक्त पंचवीस हजार रुपये इतकाच खर्च येतो, असे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अत्यंत कमी खर्च करून शत्रूचे प्रचंड प्रमाणावर नुकसान करणे, हे त्यामुळेच युक्रेनला सहज शक्य झाले आहे. त्यांनी त्यासाठी मात्र दीड वर्षे अत्यंत बारकाईने आणि काटेकोरपणे नियोजन केले आणि त्यासाठी प्रचंड गोपनीयताही पाळली.
काय म्हणाले होते डोनाल्ड ट्रम्प?
अजूनही अनेकांना आठवत असेल, की अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प असेही म्हणाले होते, की अमेरिकेचा हात डोक्यावर नसेल, तर झेलेन्स्की आणि त्यांचा युक्रेन रशियापुढे एका आठवड्यात गुडघे टेकेल. प्रत्यक्षात, अमेरिकेच्या दबावाला मुळीच भीक न घालता झेलेन्स्की यांनी हा ड्रोन हल्ला घडवून आणला आणि रशियाच्या वायूदलाची ३४ टक्के क्षमताच नष्ट करून टाकली आहे ! लष्कराची आकडेवारी, सैनिकांची संख्या, अत्यंत महागडी संरक्षण सामग्री, त्यातच कॉम्प्युटरची मोठी मदत आणि त्यासाठी कोणत्याही सरकारला करावी लागणारी प्रचंड गुंतवणूक, या सगळ्या कल्पनांना छेद देणारे हे युक्रेनचे आक्रमण आहे.
यापुढे युद्धतंत्र वेगाने बदलेल..
युक्रेनच्या या आक्रमणावर रशियाचा प्रतिसाद काय असेल, त्यांनी काय पावले उचलली आहेत, जबरदस्त धक्क्यातून ते सावरले आहेत का ? हे लवकरच कळेल, पण येथून पुढे युद्धतंत्र तंत्रज्ञानाच्या प्रभावाने अत्यंत वेगाने बदलेल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. यापुढे सैनिक संख्या, रणगाड्यांसारखी अवजड यंत्रसामुग्री यांचा प्रभाव कमी होऊन अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अत्यल्प खर्चात निर्माण करता येणारी भेदक शस्त्रे, अस्त्रे यांचे वर्चस्व युद्धतंत्रावर राहील, असे संरक्षण विषयक तज्ज्ञांना वाटत आहे आणि ते खरेच आहे.
ड्रोन्सचा रशियातील प्रवास आश्चर्यकारक !
युक्रेनने ड्रोन्सची वाहतूक ज्या ट्रक्समधून केली, ते ट्रक इतक्या मोठ्या संख्येने रशियन हद्दीत तपासणी न करता दोन ते चार हजार किलोमीटर प्रवास कसे करू शकले ? याचेच आश्चर्य वाटते, भल्याभल्यांसाठी ते न सुटणारे कोडेच आहे. कदाचित रशियामधील काही अधिकाऱ्यांना युक्रेनने फोडले असावे, असा काहींचा संशय आहे. त्याबाबत अत्यंत गोपनीयता पाळली गेली असून युक्रेनचे राष्ट्राध्यक्षच त्याचे उत्तर देऊ शकतील. ‘आर्टिफिशियल ईंटॕलिजन्स’ म्हणजेच ‘एआय’ चा वाढता प्रभाव या जगाचा चेहरामोहरा येत्या दोन पाच वर्षात पुरता बदलून टाकेल, अशी लक्षणे दिसत आहेत.
ड्रोनच्या रचनेत बदल..
आपल्याकडे क्रिकेट, फुटबॉलसारख्या सामन्यांसाठी, विवाह सोहळ्यांचे हवेतून चित्रिकरण करण्यासाठी किंवा अलीकडे कीटकनाशकांची पीकावर फवारणी करण्यासाठी आपण वापरतो, तशा ड्रोनच्या रचनेत काही बदल करून युक्रेनने रशियात प्रचंड विध्वंस घडवला, हे पाहता यापुढे ड्रोन्सच्या वापरावर अनेक कायदेशीर निर्बंध येतील, असे त्यामुळेच वाटू लागले आहे. अत्यंत कमी खर्चामध्ये शत्रूचा प्रचंड विध्वंस हे नवे युद्धतंत्र अतिशय लोकप्रिय होणार आहे. संख्याबळापेक्षा बुद्धीच यापुढे श्रेष्ठ ठरेल, याची जगाला नोंद घ्यावीच लागेल.
हाच तर शिवरायांचा ‘गनिमी कावा’ !
छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्वी अतिशय कमी मावळे हाताशी असताना अफजलखान, शाहिस्तेखान किंवा औरंगजेब यांच्या नाकी नऊ आणले. कमीत कमी यंत्रसामग्री वापरून शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करण्याची जी किमया साधली गेली त्यालाच ‘गनिमी कावा’ म्हटले गेले. त्याचीच ही सुधारित आवृत्ती आहे. सध्या प्रचंड वेगाने बदलणाऱ्या वैश्विक पटावर आपण नेमके कुठे आहोत, याचे चिंतन आपल्याला करावेच लागणार आहे. नेहमीच प्रचंड सावध राहून स्वतःचे, नागरिकांचे, अत्यंत महागड्या संरक्षण सामग्रीचे रक्षण करावे लागणार आहे, हेच या ‘स्पायडर वेब’ ने दाखवून दिले आहे. नव्या जगाचे युद्धतंत्रज्ञान आणि ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ आत्मसात केल्याशिवाय तरणोपाय नाही..आणि या नवीन युद्धतंत्राचा पासवर्ड आहे, तो म्हणजे ‘स्पायडर वेब’ !