कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का?; संजय राऊतांच्या स्वबळाच्या भूमिकेनंतर सुप्रिया सुळेंचं मत
Supriya Sule: आगामी महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र मैदानात उतरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली आहे. यावरती बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
बारामतीत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘महानगरपालिकेची निवडणूक आम्ही आधी एकत्र असतानाही वेगवेगळीच लढत होतो. मागची वेळी वेगळेवेगळे लढलो होतो, त्याच्यामध्ये नवीन काय आहे. त्यामुळे महानगरपालिका आणि जिल्हा परिषद हे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. सगळीच जर इलेक्शन्स आपल्या सोयीने लढायला लागले तर कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? त्यांना कधी नाय मिळणार? हे त्यांचंही इलेक्शन आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे असं सुप्रिया सुळे यांनी बारामती बोलताना म्हटलं आहे.
संजय राऊत यांच्या स्वबळाच्या नाऱ्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एबीपीशी बोलताना म्हणाले, ‘त्यांची इच्छा असेल स्वबळावर जायची तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण. पण आपण एकत्रित विधानसभेत झालेल्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला पाहिजे होतं, असं माझं तरी मत आहे. त्याच्यामुळे हा निर्णय फार घाईने घेतलेला दिसतोय. ग्राउंड वरती कार्यकर्त्यांचे मत काय आहे, हे आम्हालाही माहिती आहे. त्याच्यामुळे हा निर्णय योग्य आहे असं मला वाटत नाही. ठीक आहे, त्यांचा पक्ष आहे. त्यांनी निर्णय घ्यावा. शेवटी बळच कोणालातरी सोबत घेऊन जाणे, हे आम्हालाही पटणार नाही किंवा शोभणार नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
हेही वाचा – संयम व सहनशक्तीची अपूर्व देणगी राजकारणाने मला दिली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून बोलले आहेत का? त्यावर सहमतीने कधी निर्णय झालाय का? या संदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, नाही. या संदर्भातला निर्णय तर झालेला नाहीये. आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही या राऊत यांच्या वक्तव्यावर आव्हाड म्हणाले, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळते असं नाही. आमच्याही पक्षातील कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही, शेवटी मत विभागणीचा फटका कसा बसतो हा आपण लोकसभेला विधानसभेला अनुभवलेला आहे, जवळजवळ 45 सीट मत विभागणीमुळे आपल्या गेलेले आहेत, हे जर विसरून आपण असं राजकीय पाऊल टाकणार असेल तर त्यांच्यावर टीका करण्याचा काही पॉईंट नाही, पण त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी निर्णय घ्यावा असे त्यांनी पुढे म्हटले. जर वेगवेगळे लढले तर त्याचा फटका 100% तिन्ही पक्षांना बसेल अशी शक्यता, जितेंद्र आव्हाड यांनी वर्तवली आहे.
संजय राऊत म्हणाले की, नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहे. एकदा आम्हाला पाहायचे आहेच, जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय. मुंबई, ठाणे नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना संधी केव्हा देणार? कार्यकर्त्यांना संधी न दिल्यामुळे पक्ष वाढीला फटका बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका सर्व पक्षांनी स्वबळावर लढवाव्या आणि आपापल्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, अशी घोषणा त्यांनी केली आहे. संजय राऊत यांच्या घोषणेनंतर आता महाविकास आघाडीतील मित्रपक्ष नेमकी काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.