‘पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार’; अजित पवार गटाच्या मंत्र्याचं विधान चर्चेत
मुंबई | राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मोठ्या घोषणा केल्या होत्या. त्यामध्ये महिलांसाठी लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांचं वीज बील माफ तसेच शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी अशा मोठ्या घोषणा केल्या होत्या. मात्र, महायुतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले, की विधानसभेच्या निवडणुका आता संपलेल्या आहेत. तीन सिलेंडर देण्याची योजना आम्ही बंद करणार नाहीत. मुलींचं उच्च शिक्षण देखील मोफत सुरु राहील. महिलांना एसटीच्या प्रवासात ५० टक्के सवलत आहे. लाडक्या शेतकऱ्यांचं वीज बील आम्ही माफ केलेलं आहे. अशा अनेक योजना सुरु आहेत. तसेच आता पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी मग कर्ज माफी करणार आहोत. पाच वर्षात करायची आहे ना? असं मुश्रीफ म्हणाले.
हेही वाचा – दौंड परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार
मी असं म्हटलं की पाच वर्षांचा जाहीरनामा आहे. आर्थिक परिस्थिती पाहून राज्य सरकार कर्जमाफी करणार आहे. सतेज पाटील यांनी थोडी कळ काढावी म्हणून मला तसं बोलावं लागलं. पाच वर्षांसाठी आपला जाहीरनामा असतो. त्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीची परिस्थिती पाहून आम्ही योग्यवेळी कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.