वायसीएम रुग्णालयात रक्ताचा तुटवडा
पिंपरी: सातत्याने वाढत असलेले आजार आणि अपघाताच्या वाढत्या संख्येमुळे रक्ताची मागणीही वाढली आहे. परंतु रक्तदानाबाबत असलेली अपुरी माहिती आणि गैरसमजुतीमुळे रक्तदानाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मागणीच्या तुलनेत रक्तदान कमी होत असल्याने रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे.
वायसीएम रुग्णालयात वर्षभरात 13 हजार जणांनी रक्तदान केले आहे. त्यातून तीन वेगवेगळे घटक तयार करून 21 हजार जणांना पुरवठा केला आहे. तर मागील वर्षभरात 35 हजार रुग्णांनी रक्ताची मागणी केली आहे. उर्वरित रुग्णांना शहरातील खासगी रक्तपेढ्या तसेच, इतर शहरातील शासकीय रक्तपेढ्यांमधून रक्त घ्यावे लागले आहे.
हेही वाचा – कामात कुचराई केल्यास कारवाई; महसूलमंत्र्यांचा पुण्यातील कामचुकार अधिकाऱ्यांना इशारा
जनजागृतीमुळे रक्तदात्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी रक्ताच्या मागणीमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे जमा होणारे रक्त आणि मागणी यामध्ये मोठी तफावत आहे. त्याचा परिणाम रक्त पुरवठ्यावर झाला आहे. महापालिकेची आठ रुग्णालये असून, त्यामध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया होतात. तसेच इतर आजारांवरील उपचारासाठीसुद्धा रक्ताची आवश्यकता असते.
याशिवाय, खासगी रुग्णालयांतूनही रक्ताची मागणी घेऊन रुग्णांचे नातेवाईक येत असतात. याशिवाय, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांमुळे रक्तपेशीची गरज निर्माण होते. परंतु रक्ताचा तुटवडा असल्याने रक्तपेशी वेळेवर न मिळाल्यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत.
महापालिका रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची गर्दी असते. या रुग्णांच्या नातेवाइकांची परिस्थिती गरिबीची असते. त्यामुळे असे नातेवाईक खासगी रक्तपेढ्यांमधून रक्त घेऊ शकत नाहीत. त्यामुळे सामाजिक संस्थांनी रक्तदान करताना वायसीएम किंवा महापालिकेच्या इतर रुग्णालयांना प्राधान्य द्यावे, असे वासीएम रुग्णालयाच्या रक्त संकलन अधिकारी डॉ. नीता घाडगे यांनी सांगितले.