स्कूल व्हॅन, बसेसची झडती; शहर-उपनगरांत आरटीओची पथके अॅक्टिव्ह
पुणे : विधानसभा निवडणुकांची लगबग संपताच पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून स्कुल व्हॅन तपासणी मोहिमेला सुरुवात केली आहे. खराडी परिसरात स्कूल व्हॅनला लागलेल्या आगीची घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पथकांची संख्या वाढवून आरटीओने सर्व स्कूल व्हॅन, बस तपासणी सुरू केली.
खराडी परिसरात आग लागलेली स्कूल व्हॅनची सर्व कागदपत्रे पूर्ण होती. या स्कूल व्हॅनचा फिटनेस परवाना ऑगस्ट २०२५ पर्यंत आहे. तर, पीयूसी २०२७ पर्यंतची आहे. या स्कूल व्हॅनचा आग का लागली, याची तपासणी केली जात आहे. या घटनेपूर्वी देखील स्कूल व्हॅनची सतत तपासणी केली जात होती. आताही तपासणीचा वेग वाढविण्यात आला आहे. शहर आणि जिल्ह्यात पथकाकडून तपासणी व कारवाई सुरू आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली.
हेही वाचा – अधिकारी नेमून नगरपरिषद हद्दीतच सुविधा द्या; विभागीय आयुक्तांचे महापालिकेला आदेश
दरम्यान, पुणे आरटीओने ११ महिन्यांत एकूण दीड हजार स्कूल व्हॅनची तपासणी केली आहे. त्यावेळी ६०१ स्कूल व्हॅन दोषी आढळून आल्या आहेत. त्यांच्याकडून २१ लाख ७९ हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच, न्यायालायने चार स्कूल व्हॅनवर कारवाई करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. या अकरा महिन्यांत स्कूल व्हॅनवर एकूण २१ लाख ९९ हजारांची दंडात्मक कारवाई केली आहे.