राज्याचे आरोग्य सुधारणार! आरोग्य विभागात ५,२२३ पदांची मेगाभरती, शासनाचा निर्णय असा की…

वर्धा : बेरोजगार वर्ग विविध नौकरीच्या शोधात असतात. त्यातही शासकीय नौकरीस त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असते हे लपून नाही. मात्र, त्या सेवेत जाण्यासाठी जोमदार तयारी मात्र हवी. तयारी झाली की जाहिरातची वाट बघणे आलेच. ही संधी आता आरोग्य खात्याकडून आली आहे.
सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात लवकरच तब्बल ५ हजार २२३ नवीन पदांची भरती केली जाणार आहे. या संदर्भातील अधिकृत पदनिर्मितीचा शासन निर्णय (GR) नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून, यामुळे आरोग्य यंत्रणेला बळकटी मिळण्यासोबतच हजारो तरुणांना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी हे पाऊल असल्याचे म्हटल्या जाते. राज्यातील शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि जिल्हा रुग्णालयांवर कामाचा मोठा ताण पडत आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांची आणि तज्ज्ञांची पदे रिक्त असल्याने सर्वसामान्यांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर, राज्यातील आरोग्य सेवांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि ग्रामीण तसेच शहरी भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन ५ हजार २२३ पदांच्या निर्मितीमुळे आरोग्य विभागाचा कणा अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा – फडणवीस, ठाकरेंचा एकाच विमानाने प्रवास; शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, एका वाक्यात विषय संपवला
प्रसिद्ध झालेल्या शासन निर्णयानुसार, या मेगाभरतीमध्ये आरोग्य विभागातील वेगवेगळ्या श्रेणीतील आणि संवर्गातील पदांचा समावेश असेल. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका (स्टाफ नर्स), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माण अधिकारी (फार्मसिस्ट) तसेच इतर तांत्रिक व अतांत्रिक प्रशासकीय पदांचा प्रामुख्याने समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांपासून ते जिल्हास्तरीय रुग्णालयांपर्यंत आवश्यकतेनुसार या जागांचे वाटप केले जाणार आहे. पदनिर्मितीचा शासन निर्णय जारी झाल्यामुळे आता लवकरच या सर्व जागांसाठीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली जाईल. ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि गतिमान पद्धतीने राबवण्याचे नियोजन प्रशासनाकडून केले जात आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे लागतील. आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि निकषांची सविस्तर माहिती आगामी जाहिरातीमध्ये स्पष्ट केली जाईल.
गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रातील पदविका व पदवीधारक तरुण मोठ्या भरतीची वाट पाहत होते. ही नवी घोषणा आणि शासन निर्णय समोर आल्यामुळे उमेदवारांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. विद्यार्थ्यांनी आतापासूनच या परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली आहे. लवकरच या ५ हजार २२३ जागांसाठीची अधिकृत अधिसूचना आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आरोग्य विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केले की या जागा विविध गटातील आहेत. त्या साठी अपेक्षित पात्रता व निकष लवकरच जाहीर केल्या जातील.





