अधिकारी नेमून नगरपरिषद हद्दीतच सुविधा द्या; विभागीय आयुक्तांचे महापालिकेला आदेश
पुणे : फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन्ही गावांतील नागरी सुविधांचे हस्तांतरण टप्प्याटप्प्याने नगर परिषदेकडे केले जाणार आहे. मात्र, तो पर्यंत या गावांत महापालिकेनेच सुविधा देण्याचे शासन आदेश आहेत. पण, यासाठी गावकऱ्यांना हडपसर परिमंडळ कार्यालय आणि मुख्य इमारतीत यावे लागत आहे. त्यावर या सुविधा गावातच महापालिका अधिकारी नेमून उपलब्ध करून देण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी महापालिका प्रशासनास केल्या आहेत.
या गावांसाठी शासनाने नेमलेल्या समितीच्या बैठकीत या सूचना करण्यात आल्या. शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक पार पडली. या नगर परिषदेसाठीचा आकृतीबंध तत्काळ तयार करण्याच्या सूचना तेथील प्रशासकांना देण्यात आल्या आहेत. या दोन्ही गावांची स्वतंत्र नगर परिषद करण्यात आली असली, तरी पुढील काही महिने या गावांसाठीच्या सुविधांचे हस्तांतरण करण्यासाठी समिती नेमली आहे. या समितीने त्याचा कृती आराखडा शासनास सादर करायचा आहे.
हेही वाचा – ‘आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या’; खासदार सुप्रिया सुळे
मात्र, या समितीची एकही बैठक झालेली नव्हती. या गावांमधे सध्या महापालिकाच दैनंदिन सुविधा देत असली तरी त्याचे कामकाज हडपसर परिमंडळ कार्यालयातून चालत आहे. त्यामुळे नागरिकांना वारंवार या कार्यालयात जावे लागते. त्यामुळे या सुविधा गावातच मिळाव्यात, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. त्यानुसार महापालिकेने तातडीने ती व्यवस्था करावी, संबंधित विभाग प्रमुखांनी आवश्यक माहिती तसेच कागदपत्रांचे नगरपरिषद प्रशासकाकडे तत्काळ हस्तांतरण करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर या दोन्ही गावांंमधे मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई जाणवली होती. त्यावरूनही या बैठकीत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आहेत. यावरून महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने गावांमध्ये तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आहेत. या गावांमध्ये प्रामुख्याने टॅंकरने पाणी दिले जात असून त्यांची संख्या कमी करू नये, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.