शरद पवार गटाच्या खासदाराने घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Politics : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिवसेना (शिंदे गट)मध्ये प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या घडामोडींना ‘ऑपरेशन टायगर’ असे नाव दिले जात असतानाच आता ‘ऑपरेशन तुतारी’चीही जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
शिवसेना ठाकरे गटातील ९ पैकी ६ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरे गटाकडे आता केवळ तीन खासदार उरले आहेत. तर शिंदे गटाच्या लोकसभा खासदारांची संख्या १३ वर पोहोचली आहे. या घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांनी बंड झालेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याचा आणि पक्षसंघटना मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांमध्ये भर पडली ती बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेल्या भेटीमुळे. या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना पक्षातील खासदार फुटणार नसल्याचा ठाम दावा केला.
रोहित पवार म्हणाले की, “खासदारांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि समाजवादी पक्षाचा एकही खासदार फुटणार नाही. भाजपला भविष्यातील मतदारसंघ पुनर्रचनेसाठी आणखी खासदारांची गरज असू शकते, पण आमच्या पक्षात अशी कोणतीही परिस्थिती निर्माण होणार नाही.”
हेही वाचा – सोसायटी मेंटेनन्सचा वाद मिटणार? महाराष्ट्रातील नव्या गृहनिर्माण नियमांत नेमकं काय बदलणार…
बजरंग सोनवणे यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीबाबत बोलताना त्यांनी म्हटले की, “विलास घुले हत्या प्रकरणात त्यांच्या मुलावर झालेले आरोप आणि राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेली जबाबदारी यामुळे त्यांनी ही भेट घेतली असावी.”
रोहित पवार सध्या शेतकरी कर्जमाफीसंदर्भात जनजागृती दौऱ्यावर असून, बीडमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात ‘ऑपरेशन तुतारी’ होण्याची शक्यता फेटाळून लावली.
सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)कडे एकूण ९ खासदार आहेत. त्यापैकी ८ लोकसभा आणि १ राज्यसभा सदस्य आहे. सुप्रिया सुळे (बारामती), अमोल कोल्हे (शिरूर), धैर्यशील मोहिते-पाटील (माढा), अमर काळे (वर्धा), बजरंग सोनवणे (बीड), निलेश लंके (अहिल्यानगर),, भास्कर भगरे (दिंडोरी), सुरेश म्हात्रे (भिवंडी) लोकसभेतील खासदार आहेत, तर शरद पवार हे राज्यसभेतील खासदार आहेत.
दरम्यान, बजरंग सोनवणे यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले असले, तरी या भेटीबाबत कोणतीही अधिकृत राजकीय भूमिका किंवा पक्षांतराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे ‘ऑपरेशन तुतारी’च्या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.





