‘संभाजी ब्रिगेड’चे डॅशिंग नेते प्रवीण गायकवाडांवर हल्ला!
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमधील घटना : तोंडावर आणि डोक्यावर शाई ओतून आंघोळ !
सोलापूर / पुणे : ‘संभाजी ब्रिगेड’ चे धडाडीचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये मोठा हल्ला झाला. त्यांच्या तोंडावर आणि डोक्यावर प्रथम काळे फासून शाईची बादलीच रिकामी करून त्यांना आंघोळ घातली गेली. तत्पूर्वी, त्यांना मारहाणही करण्यात आली. ‘शिवधर्म फाऊंडेशन’ च्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी बऱ्याच जणांची धरपकड केली आहे. ‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती असा उल्लेख नाही. त्याचप्रमाणे संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख आहे, यासाठी ही मारहाण करण्यात आल्याचे समजते.
व्हीडिओ व्हायरल, विरोधकांची टीका..
या हल्ल्याचा व्हीडिओ सध्या ‘सोशल मीडिया’ वर व्हायरल होत आहे. त्यामध्ये त्यांचे कपडे फाडण्यात आल्याचेही स्पष्ट दिसत आहे. विरोधकांनी आता हल्ल्यावर टीका केली आहे. स्वतः प्रवीण गायकवाड, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
सत्कार समारंभाच्या वेळी प्रकार..
पुरोगामी चळवळीतील नेते, व्याख्याते, लेखक म्हणून लोकप्रिय असलेल्या प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा अनेकांनी निषेध केला आहे. अक्कलकोट येथे एका सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असताना ‘शिवधर्म फाऊंडेशन’ च्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. यावेळी त्यांच्या गाडीचेही नुकसान करण्यात आले, तसेच त्यांचे कपडेही फाडण्यात आल्याचे व्हीडिओत दिसत आहे.
गाडीतून बाहेर खेचले..
अक्कलकोटमधील फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड आले होते. यावेळी गाडीतून उतरल्याबरोबर काही जणांनी अचानक त्यांच्या डोक्यावर शाई ओतली. यानंतर प्रवीण गायकवाड यांनी गाडीकडे धाव घेत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना गाडीतून खेचत बाहेर काढण्यात आले आणि काळे फासून मारहाण करण्यात आली.
हेही वाचा – शुभांशू शुक्ला आज पृथ्वीवर परतणार, भारताच्या अंतराळ इतिहासात सुवर्णक्षण; जाणून घ्या..
सुप्रियाताईंचा तीव्र संताप..
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. निषेध करण्याची ही पद्धत नव्हे, त्याचप्रमाणे धडाडीच्या प्रवीणदादा यांचे पुरोगामी विचार ज्यांना पटत नाही त्यांनी हा हल्ला घडवून आणला असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांचा संपूर्ण रोख भारतीय जनता पार्टीकडे होता.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले ?
माझे जवळचे स्नेही व पुरोगामी विचारांचे शिलेदार, संभाजी ब्रिगेडचे नेते, महाराष्ट्राला लढवय्ये म्हणून सुपरिचित असलेले प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करीत असल्याचे उद्गार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी काढले. त्यांनी याबाबत एक व्हीडिओ शेअर करत गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला.
गायकवाड यांचे सरकारवर आरोप..
‘संभाजी ब्रिगेड’ चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी सरकावर आरोप केले. आपल्यावरील हल्ल्याच्या घटनेला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे, असे ते म्हणाले. तसेच आपल्या हत्येचा कट होता आणि ही शेवटाची सुरुवात आहे, असे देखील प्रवीण गायकवाड म्हणाले आहेत.
मला मारण्याचा प्रयत्न : गायकवाड
मी अक्कलकोटला गेलो होतो. अचानकपणे ‘शिवधर्म फाऊंडेशन’ च्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर काळे वंगण तेल टाकले. त्यांनी माझ्यावर हल्ला केला. त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट खरी आहे. पण ही विचारधारा जी आहे, तुम्हाला आठवत असेल, डॉ. पानसरे यांचा खून झाला. डॉ. कलबुर्गी, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाला. डॉ. गौरी लंकेशचा खून झाला. या सत्ताकाळात पुरोगामी विचारांचे कार्यकर्ते हे असुरक्षित आहेत”, असे प्रवीण गायकवाड म्हणाले. ही शेवटाची सुरुवात आहे, असेही ते म्हणाले. कधीकधी पक्ष फोडले जातात, पक्षांनंतर मग कार्यकर्ते फोडण्याचा प्रयत्न केला जातो. आम्ही एक सत्य विचारसरणीचचे काम करतो. आमचा विचार हा राज्यघटनेला अपेक्षित असलेला समता, बंधूता, न्याय आणि स्वातंत्र्याचा आहे. या देशात मानवता प्रस्थापित झाली पाहिजे, यासाठी ‘संभाजी ब्रिगेड’ चे काम चालू आहे आणि ते चालू राहणार आहे. पण दुर्दैवाने अशा सामाजिक संघटनांबाबत काही गैरसमज पसरवले जातात. मग अशा हिंदुत्ववादी विचारसरणीचे कार्यकर्ते माझ्यावर हल्ला करतात, असे गायकवाड म्हणाले.
संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख म्हणून..
‘संभाजी ब्रिगेड’ या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख असल्यामुळे हा हल्ला करण्यात आल्याचे नंतर सांगण्यात आले. ‘शिवधर्म फाऊंडेशन’ ने याआधीही या नावावर आक्षेप घेतलेला होता. हा हल्ला झाल्यानंतर फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि इतर कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.





