रा. स्व. संघ जनकल्याण समिती’तर्फे आरोग्यविषयक जागृती मोहीम
रविवारी ‘सेवा भवन दौड़ : मूत्रपिंडाच्या स्वास्थ्या विषयी जनजागृती

पुणे : ‘सेवा भवन’ या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे ‘सेवा भवन दौड़’ या मूत्रपिंडाच्या स्वास्थ्या विषयी जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘सेवा भवन दौड़’चा प्रारंभ रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता होईल. या उपक्रमापासून ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’च्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेचाही प्रारंभ होणार आहे.
‘जनकल्याण समिती’तर्फे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत समितीचे कार्यवाह प्रमोद गोऱ्हे आणि ‘सेवा भवन’ प्रकल्पाचे कार्यवाह पलाश देवळणकर यांनी ही माहिती दिली. ‘रन फॉर किडनी हेल्थ’ हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेवा भवन दौड़’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘जनकल्याण समिती’तर्फे ‘सेवा भवन’ हा सेवा प्रकल्प चालवला जातो. या प्रकल्पाच्या वतीने ‘सेवा भवन दौड़’ होत असून कर्वेनगरमधील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेपासून त्याचा प्रारंभ होईल.
या ‘दौड़’चे पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर असे दोन टप्पे आहेत. या शिवाय ‘चॅरिटी रन’ हा उपक्रमही केला जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, लेखक, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, प. महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सेवा भवन दौड़’चा प्रारंभ होईल.
हेही वाचा : कर्जाचा EMI कमी होणार! RBI कडून रेपोदरात कपात
‘जनकल्याण समिती’तर्फे आरोग्यविषयक जागृती मोहीम सुरू केली जात असून या मोहिमेचा प्रारंभ ‘सेवा भवन दौड़’ या उपक्रमापासून केला जाणार आहे. या मोहिमेत प्रामुख्याने तज्ज्ञ डॉक्टरांची आरोग्यविषयक व्याख्याने, विविध विषयांवर चर्चासत्र, आरोग्य शिबिरे, जिज्ञासूंचे शंका-समाधान, महिलांसाठी संवादसत्र, योग, स्वास्थ्य, जीवनशैली याबाबतचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन ‘जनकल्याण समिती’तर्फे ‘सेवा भवन’मध्ये केले जाणार आहे.
‘सेवा भवन’ या प्रकल्पात अल्प दरात डायलिसिसची सुविधा आहे. पुण्यात उपचारांसाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची निवास, भोजन आदी व्यवस्थाही अल्प शुल्कात केली जाते. याशिवाय निःशुल्क स्वास्थ सल्ला आणि समुपदेशन केंद्र चालवले जाते. किडनी आजारासंबंधीची जनजागृती आणि ‘सेवा भवन’ प्रकल्पाची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेवा भवन दौड़’ आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या उपक्रमामध्ये १८ वर्षांवरील महिला आणि पुरुषांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी नोंदणी आवश्यक असून ८२७५३९६३९७ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करता येईल.