‘महिलांवरील वाढत्या अत्याराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी’; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : शहरात घडत असलेल्या महिलांवरील अत्याचार, लहान मुलांचे लैंगिक शोषण या घटनांमुळे पोलिस विभागाने अधिक सतर्क राहून, अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी. शाळांमध्ये ‘बॅड टच गुड टच’ उपक्रम राबवून मुले आणि पालकांमध्ये जनजागृती करावी. निर्जन स्थळी पोलिस चौकी अद्ययावत आणि सीसीटीव्ही बसवून तेथील हालचालींवर देखरेख व्हावी, अशा सूचना दिल्याचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात आयोजीत पत्रकार परिषदेत सांगितले.
पोलीस आयुक्त कार्यालयात डॉ. गोऱ्हे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर त्या बोलत होत्या. पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना चिंताजनक असून पोलीसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. त्यात कोणालाही दया दाखवू नका, अशा सक्त सूचना देत, बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसर यासह अन्य निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी. निर्जन स्थळी पोलीस चौकी अद्यावत करावी आणि रात्रीच्या वेळी प्रभावशील प्रकाश झोताची आणि भोंग्यांची व्यवस्था करावी. याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे.
हेही वाचा – ‘मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं’; ठाकरे गटाच्या आमदाराचा मोठा दावा
गेल्या काही वर्षात तात्काळ पैसा कमावण्याच्या मोहापाई गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येते. त्यावर वचक ठेवावी. महिला दक्षता समित्यांच्या बैठकांमधून फलनिष्पती काय झाली, तक्रारींचा निपटारा कसा केला याबाबतचा कृती अहवाल दक्षता समितीमधील महिला सदस्यांना द्यावा. यामुळे गुन्हेगारी नियंत्रणात येवू शकते. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विविध कक्ष स्थापन करण्याच्या सूचना आहेत. त्यानुसार ज्येष्ठ नागरिक कक्ष, जात पंचायत निमुर्लन कक्ष, अंध श्रृद्धा निमुर्लन कक्ष तसेच मानवी तस्करी संदर्भातील कक्ष स्थापन होणे आवश्यक आहे.
काही ठिकाणी घरातील व्यक्तिंकडूनच महिलांवर आणि मुलींवर अत्याचार होताना दिसत आहेत. अशा वेळी नातेवाईकांनी पुढे येवून पोलीसांकडे तक्रार देणे आवश्यक आहे. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचारामध्ये शाळा, महाविद्यालयाच्या तसेच स्कुल बसचे वाहनचालक आणि वाहक यांची चारित्र्य पडताळणी होणे आवश्यक आहे. शाळांमध्ये गांभीर्यपूर्वक ‘बॅड टच गुड टच’ याची कार्यशाळा आणि मार्गदर्शन व्हावे. शहरात नवीन पोलीस ठाणे वाढविण्याबाबत शासन सकारात्मक असून त्यादृष्टिने प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती उपसभापती डाॅ. निलम गोऱ्हे यांनी सांगितली.





