‘मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं’; ठाकरे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

मुंबई | मला इंजेक्शन देऊन सुरतला नेलं होतं. सुरतमध्ये माझा घातपात करण्याचा कट काही लोकांनी रचला होता, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) बाळापूरमधील नागरिकांशी संवाद साधला.
नितीन देशमुख म्हणाले, माझ्यामागे या सत्ताधाऱ्यांनी चौकशीचा ससेमिरा लावला आहे. माझ्या दहावीत शिकणाऱ्या मुलाची चौकशी चालू आहे. आठवी इयत्तेत शिकणाऱ्या माझ्या मुलीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी केली जात आहे. हे सगळं पाहूनही तुमचा हा आमदार कधी डगमगला नाही. पक्ष फुटला तेव्हा मी सुरतला गेलो होतो. कुठल्या परिस्थितीत त्या लोकांनी मला नेलं, माझा घात केला ते तुम्ही सर्वांनी पाहिलं आहे.
हेही वाचा – संविधान भवनाच्या उभारणीसाठी 120 कोटी रुपयांची निविदा!
पक्ष फुटले, गद्दारी झाली त्या काळात मला सुरतला कशा पद्धतीने नेलं हे मी यापूर्वी देखील सांगितलं आहे. त्या लोकांनी मला इंजेक्शन दिलं आणि घेऊन गेले. त्यानंतर त्यांनी वृत्तवाहिन्यांना बातमी दिली की आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. खरंतर मला असा कोणताही झटका आला नव्हता. त्यांना केवळ तशी बातमी पसरवायची होती. ती बातमी केवळ तुमच्या या आमदाराचा घातपात करण्यासाठीच पसरवली होती, असं देशमुख म्हणाले.
एका भाजपा आमदाराचं ट्रेनमध्ये वरिष्ठांशी बोलणं झालं. दिल्लीतून फोन आला होता की कोणत्याही परिस्थितीत नितीन देशमुख परत जाता कामा नये. त्याला हवं तर मारून टाका, त्याचा गेम करा. त्याचदरम्यान, टीव्हीवर बातमी झळकली की आमदार नितीन देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. मला कोणताही झटका आला नव्हता. केवळ त्या लोकांना वरून (वरिष्ठांचा) फोन आला होता की नितीन देशमुख ऐकत नसेल तर त्याचा गेम करून टाका. मला मारून तशी बातमी दाखवली जाणार होती. हे सगळं भाजपाचा एक आमदार सांगत होता. परंतु, मी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे. उद्धव ठाकरे यांचा मावळा आहे. मी त्यांच्यासमोर झुकलो नाही. गद्दारांबरोबर गेलो नाही. माझी तुम्हा मतदारांकडून एकच अपेक्षा आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. तेव्हाच माझं समाधान होईल. तुमच्या या आमदाराला पराभूत करण्यासाठी केवळ साधेसुधे प्रयत्न चालू नाहीत तर कटकारस्थानं चालू आहेत, असंही नितीन देशमुख म्हणाले.





