To The Point : “आपेक्षांचा कचरा नको; मोशीकरांना न्याय आणि कायमस्वरूपी तोडगा हवा!”
ग्रामस्थांचा सवाल : आमच्या संयमाचा अंत पाहणार की कचऱ्याचा? प्रशासनाने आता निर्णय घ्यावाच!
पिंपरी-चिंचवडच्या विकासाची आणि स्वच्छतेची किंमत जर कोणत्या भागाने चुकवली असेल, तर ती मोशी ग्रामस्थांनी. गेली अनेक दशके संपूर्ण शहराचा कचरा आपल्या अंगावर घेतलेल्या मोशीने आज संतप्त होऊन प्रशासनाला एकच प्रश्न विचारला आहे – “आमच्या अपेक्षांचा कचरा किती दिवस करणार?”
मोशीतील दुर्घटनेने अनेक निष्पाप कामगारांचे जीव घेतले. अनेक कुटुंबांचे आधार हिरावले. पण, ही दुर्घटना केवळ एक अपघात नाही; ती वर्षानुवर्षे दुर्लक्षित राहिलेल्या इशाऱ्यांची परिणती आहे. मोशीकरांनी अनेकदा आवाज उठवला, निवेदने दिली, आंदोलने केली; मात्र प्रत्येक वेळी त्यांच्या वाट्याला आली ती फक्त आश्वासने.
महाईन्यूजची भूमिका स्पष्ट आहे – मोशीकरांना न्याय मिळालाच पाहिजे आणि कचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली एका परिसराचे बलिदान देण्याची परंपरा आता थांबली पाहिजे.
पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज सुमारे १,५०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. धक्कादायक बाब म्हणजे त्यापैकी केवळ ८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होते. म्हणजेच, जवळपास निम्मा कचरा व्यवस्थापनाच्या यंत्रणेबाहेर राहतो. हा आकडा केवळ प्रशासनाच्या अपुऱ्या नियोजनाचा पुरावा नाही, तर भविष्यातील मोठ्या संकटाची घंटा आहे.
आज प्रश्न फक्त मोशीचा नाही. प्रश्न संपूर्ण शहराच्या भवितव्याचा आहे. शहर वाढत आहे, लोकसंख्या वाढत आहे, उद्योग वाढत आहेत; पण कचरा व्यवस्थापनाची क्षमता त्याच वेगाने वाढताना दिसत नाही. मग उद्या हा अतिरिक्त कचरा कुठे जाणार? आणखी एक मोशी निर्माण करणार का?
महाईन्यूज प्रशासनाला थेट प्रश्न विचारते – मोशीने शहरासाठी इतके काही दिले, पण शहराने मोशीला काय दिले? दुर्गंधी, प्रदूषण, आजार आणि अखेरीस मृत्यू?
आता वेळ आली आहे ती कठोर निर्णयांची. विद्यमान कचरा प्रक्रिया प्रकल्प १०० टक्के क्षमतेने चालविणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्याचबरोबर, अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन कचरा प्रक्रिया प्रकल्प तातडीने उभारले गेले पाहिजेत. कचऱ्याचा भार एका भागावर टाकण्याची सोयीस्कर भूमिका आता संपली पाहिजे.
मोशी दुर्घटनेतील दोषींवर कारवाई झालीच पाहिजे. मृतांच्या कुटुंबीयांना न्याय आणि जखमींना संपूर्ण मदत मिळालीच पाहिजे. पण, केवळ एवढ्यावर हा विषय संपणार नाही. कारण, हा प्रश्न केवळ नऊ किंवा अकरा जीवांचा नाही; हा प्रश्न लाखो नागरिकांच्या सुरक्षिततेचा आहे.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी हे लक्षात ठेवावे की, नागरिकांचा संयम हा त्यांच्या निष्क्रियतेचा परवाना नाही. मोशीकरांनी दशकानुदशके सहन केले आहे; आता त्यांची सहनशीलता संपत चालली आहे.
आज मोशी म्हणते आहे – “आमच्या अपेक्षांचा कचरा करू नका!” उद्या जर संपूर्ण पिंपरी-चिंचवडने हाच सूर लावला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार?
महाईन्यूजचा ठाम इशारा आहे – जर आज कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गांभीर्याने हाताळला नाही, तर उद्याचा पिंपरी-चिंचवड हा स्मार्ट सिटी म्हणून नव्हे, तर “कचऱ्याच्या खाईत अडकलेले शहर” म्हणून ओळखला जाईल.
मोशीकरांना न्याय द्या. कचरा प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालवा. नवीन प्रकल्प उभारा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, शहराच्या विकासाच्या नावाखाली एका गावाचा बळी देणे थांबवा.
कारण, विकासाच्या प्रत्येक घोषणेपेक्षा एक प्रश्न मोठा आहे – “मोशीचा अंत पाहणार की कचऱ्याचा?”




