Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

दिल्लीत विद्यार्थ्यांवर बेफाम लाठीचार्ज: राज ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका

मुंबई | दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेला बेफाम लाठीचार्ज आणि सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या पद्धतीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “हे सरकारच मानसिक रुग्ण झाले असून त्यांनाच रुग्णालयात भरती करण्याची गरज आहे,” असा टोला लगावत त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर आणि कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवरून पोस्ट करत सरकारवर ताशेरे ओढले.

राज ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारने सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज केला. यावरून सरकार जनतेच्या रास्त मागण्यांची आंदोलने चिरडण्यात धन्यता मानत असल्याचे स्पष्ट होते. “आंदोलने निर्दयीपणे चिरडण्यात कुठलाही पुरुषार्थ नसतो, तर ती सामंजस्याने सोडवण्यात खरी बुद्धिमत्ता आणि मोठेपणा असतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करावी

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत राज ठाकरे यांनी सवाल केला की, “धर्मेंद्र प्रधान कोण लागून गेले आहेत, ज्यांचा राजीनामा घेणे सरकारला स्वतःचे अपयश वाटत आहे?” तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ते म्हणाले, “पंतप्रधान नेहमी ‘परीक्षा पे चर्चा’ करतात, मग आता रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांशी त्यांनी थेट संवाद साधावा. सरकारचा अहंकार यापेक्षा देशातील विद्यार्थ्यांचा आक्रोश महत्त्वाचा आहे.”

हेही वाचा

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल रॅली!

‘ईव्हीएम’च्या जोरावर निवडून आल्याचा अहंकार

सत्ताधाऱ्यांच्या मानसिकतेवर ताशेरे ओढताना मनसे प्रमुखांनी म्हटले की, “आम्ही काय करायचे हे विरोधी पक्ष किंवा जनतेने सांगायचे नाही; कारण ‘आम्ही तुमच्या मतांवर नव्हे, तर यंत्रणा आणि ईव्हीएमच्या जोरावर निवडून येतो’ अशीच भावना सध्याच्या सत्ताधाऱ्यांची झाली आहे.”

विद्यार्थ्यांच्या असंतोषातूनच क्रांतीचा उगम

विद्यार्थ्यांच्या संघर्षाचे कौतुक करताना राज ठाकरे यांनी जागतिक इतिहास आणि जयप्रकाश नारायण यांच्या ‘संपूर्ण क्रांती’ आंदोलनाचा दाखला दिला. श्रीलंका (२०२२), अरब स्प्रिंग (२०११) आणि नेपाळमधील आंदोलने ही विद्यार्थ्यांच्या असंतोषातूनच उभी राहिली होती. “हे आंदोलन फक्त एका परीक्षेपुरते मर्यादित नसून महागाई, कंत्राटदारशाही, एकाच उद्योगपतीचे भले करणे आणि शहरांचा गुदमरलेला विकास याविरुद्ध जनतेच्या मनात साचलेल्या नैराश्याचा हा उद्रेक आहे,” असे ते म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button