पुणेरी मेट्रोत स्मार्ट तिकीट व्यवस्थेची एंट्री; WhatsApp QR ते NCMC कार्डपर्यंत सर्व सुविधा एकाच छताखाली!
प्रवास होणार अधिक जलद, डिजिटल आणि अखंड; लाईन ३ वरील १२ स्थानकांवर अत्याधुनिक AFC प्रणाली सज्ज

पुणे | पुणेरी मेट्रोच्या लाईन ३ च्या प्रारंभासोबतच प्रवाशांसाठी अत्याधुनिक आणि पूर्णपणे डिजिटल स्मार्ट तिकीट व्यवस्था उपलब्ध होणार आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC), WhatsApp QR तिकीट, मोबाईल अॅप, तिकीट व्हेंडिंग मशीन (TVM), तिकीट काउंटर तसेच UPI आणि डेबिट कार्डसारख्या डिजिटल पेमेंट सुविधांमुळे मेट्रो प्रवास अधिक सुलभ, जलद आणि आधुनिक होणार आहे.
पुणे मेट्रो लाईन ३ वरील प्रवासी वाहतुकीच्या पहिल्या टप्प्यात सुरू होणाऱ्या १२ स्थानकांवर ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन (AFC) प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. प्रत्येक स्थानकावर दोन प्रवेशद्वार, दोन निर्गमनद्वार आणि दिव्यांगांसाठी स्वतंत्र प्रवेश व्यवस्था अशा एकूण पाच AFC गेट्सची सुविधा असणार आहे. गर्दीच्या वेळेत प्रवाशांची वर्दळ सुरळीत राहावी, यासाठी स्मार्ट क्यू मॅनेजमेंट प्रणालीदेखील कार्यान्वित करण्यात आली आहे. उर्वरित स्थानकांवरही ही सुविधा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या ‘वन नेशन, वन कार्ड’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पुणे मेट्रो लाईन ३ वर प्रवासी सेवेला सुरुवात झाल्यापासून NCMC कार्डचा वापर करता येणार आहे. विशेष म्हणजे, हे एकच कार्ड पुणे मेट्रोच्या लाईन १, लाईन २ तसेच देशातील इतर शहरांतील मेट्रो सेवांसाठीही उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे विविध शहरांसाठी वेगवेगळी कार्डे बाळगण्याची गरज संपुष्टात येणार आहे.
सध्या पुणे मेट्रोच्या लाईन १ आणि लाईन २ साठी वापरल्या जाणाऱ्या अधिकृत मोबाईल अॅपमध्ये आता लाईन ३ साठी स्वतंत्र तिकीट बुकिंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आगामी काळात डिस्ट्रिक्ट कोर्ट स्थानकावर तिन्ही मार्गांचे एकत्रीकरण पूर्ण झाल्यानंतर एकाच अॅपवरून संपूर्ण पुणे मेट्रो नेटवर्कसाठी अखंड प्रवासाचे तिकीट बुक करता येणार आहे.
हेही वाचा
विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे एसआयआर मोहिमेला गती
प्रवाशांसाठी आणखी एक मोठी सुविधा म्हणजे WhatsApp QR तिकीट सेवा. WhatsApp वरून थेट QR कोडच्या माध्यमातून तिकीट मिळणार असल्याने तिकीट खिडक्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. याशिवाय प्रत्येक स्थानकावर तिकीट व्हेंडिंग मशीन आणि तिकीट काउंटरची सुविधा उपलब्ध राहणार असून, दिव्यांग प्रवाशांच्या सोयीचा विचार करून TVM जागतिक सुलभता निकषांनुसार विकसित करण्यात आले आहेत.
तिकीट खरेदीसाठी रोख रक्कम, UPI, डेबिट कार्ड तसेच इतर डिजिटल पेमेंट पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. स्थानकांवर QR आणि कार्ड स्कॅनिंग यंत्रणा बसविण्यात आल्यामुळे प्रवेश आणि निर्गमन प्रक्रिया अधिक वेगवान आणि अचूक होणार आहे.
पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीला केंद्रस्थानी ठेवून ही स्मार्ट तिकीट व्यवस्था विकसित केली आहे. भविष्यात पुणे मेट्रोचे विस्तारणारे नेटवर्क, वाढती प्रवासी संख्या आणि अखंड कनेक्टिव्हिटी लक्षात घेता ही व्यवस्था सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
स्मार्ट तिकीट व्यवस्थेची वैशिष्ट्ये
1. एकाच NCMC कार्डवर देशातील विविध शहरांतील मेट्रो प्रवासाची सुविधा
2. WhatsApp वरून थेट QR तिकीट उपलब्ध
3. मोबाईल अॅपद्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंग
4. प्रत्येक स्थानकावर TVM आणि तिकीट काउंटर
5. रोख, UPI, डेबिट कार्डसह विविध पेमेंट पर्याय
6. दिव्यांगांसाठी सुलभ आणि जागतिक निकषांनुसार TVM
7. स्मार्ट AFC गेट्समुळे जलद प्रवेश-निर्गमन
8. भविष्यात एकाच अॅपवरून संपूर्ण पुणे मेट्रो नेटवर्कसाठी अखंड तिकीट सुविधा





