महापालिकेची मंगेशकर रुग्णालयास नोटीस, मिळकतकराची थकबाकी दोन दिवसात भरा
महापालिका प्रशासनाकडून रक्कम न भरल्यास जप्तीच्या कारवाईचा इशारा

पुणे : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने महापालिकेचा एकही रुपयांचा मिळकतकर थकविला नसल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला होता. त्याच्या दिवशी महापालिकेने मंगेशकर रुग्णालयास थकीत मिळकत कर भरण्याबाबत नोटीस बजावली आहे.
तेवढ्यावरच न थांबता रुग्णालयास पत्र मिळाल्यानंतर दोन दिवसात संबंधित रक्कम न भरल्यास जप्तीची कारवाई करण्याचा इशाराही महापालिकेने दिला आहे.
मंगेशकर रुग्णालयाने तनिषा भिसे या महिलेस वेळेत उपचार न दिल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर रूग्णालय प्रशासनाविरुद्ध असंतोष व्यक्त होऊ लागला आहे. त्यातच, रुग्णालयाने महापालिकेचा मिळकतकर थकविल्याचा प्रश्न रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ.धनंजय केळकर यांना विचारल्यानंतर त्यांनी महापालिकेचा एकही रुपयांचा मिळकतकर थकविला नसल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते.
हेही वाचा : माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मंतरलेल्या दिवसांचा उजाळा
तसेच खासदार सुप्रिया सुळे यांनीही सोमवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत मंगेशकर रुग्णालयाने थकविलेल्या मिळकत कराच्या वसुलीवरून महापालिका प्रशासनाने मंगेशकर रुग्णालयासमोर बॅण्ड का वाजविला नाही, असा प्रश्न करत प्रशासनास धारेवर धरले होते. तसेच कर वसुली न केल्यास आंदोलनाचा इशाराही सुळे यांनी दिला होता.
दरम्यान, या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन महापालिकेच्या मिळकत कर विभागाने थकबाकीबाबत मंगळवारी लता मंगेशकर मेडीकल फाउंडेशनला नोटीस बजाविली. त्यामध्ये महापालिकेने २०१६-२०१७ मध्ये रुग्णालयाला केलेली कर आकारणी मान्य नसल्याने फाउंडेशनने पुणे महापालिकेविरूद्ध न्यायालयात दावा दाखल केला होता.
या दाव्याबाबत न्यायालयाने महापालिकेकडून आकारण्यात येत असलेल्या सर्वसाधारण करामध्ये ५० टक्के सवलत देण्यास मान्यता दिली होती. संबंधित ५० टक्के रक्कम आणि उर्वरित इतर कर महापालिकेकडे भरण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार २०१४ ते मार्च २०२५ अखेरपर्यंत संस्थेकडे २२ कोटी ६ लाख ७६ हजार ८१ रुपयांची थकबाकी न्यायालयाच्या आदेशानुसार दिसून येत असल्याचे स्पष्ट झाले होते.
रूग्णालयाकडील थकबाकीबाबत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये पृथ्वीराज बी. पी यांनी थकबाकी न भरणाऱ्या या मिळकतीवर नियम ४२ च्या तरतुदीनुसार जप्तीची कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या मिळकतकर विभागाने मंगेशकर रुग्णालय प्रशासनाला नोटीस बजाविली आहे.
प्रशासनाने संबंधित नोटीस मिळताच दोन दिवसात थकबाकीची २२ कोटी ६ लाख ७६ हजार ८१ रुपये ही रक्कम तत्काळ भरावी, अन्यथा जप्तीची कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने रूग्णालय प्रशासनाला दिला आहे.