ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

ही डरकाळी नव्हे नाथाभाऊ, हे तर गाढवाचे खिंकाळणे !

एकेकाळचे भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे रोजच नवीन वादात घुसत असून खड्ड्यात निघाले आहेत. वास्तविक, एकेकाळचा मुख्यमंत्रीपदाचा हा नेता केवळ हलक्या कानांमुळे आणि कोणतेही ठोस धोरण नसल्यामुळे मागे पडत चालला आहे..आता तर संपत चालला आहे !

शिष्य केव्हाच गेले पुढे निघून..

एकनाथ खडसेंना गुरु मानणारे भाजपामधील त्यांचे अनेक शिष्य आता कुठल्या कुठे पोहोचले असून जळगावात बसलेला नाथाभाऊ त्यांच्या नावाने बोटे मोडण्याशिवाय काहीही करत नाहीत. २०१४ मध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले, त्यावेळी स्पर्धेतील नाव हे एकनाथ खडसे यांचे होते, हे लक्षात घ्या..

पाहा, गिरीश महाजन कुठे पोहोचले?

जळगावच्या राजकारणात अगदीच ज्युनिअर असणारे गिरीश महाजन कुठल्या कुठे पोहोचले आणि आपल्याला डावलल्याची भावना सतत डोक्यात ठेवून सूडाचे बोल बोलणारे नाथाभाऊ मात्र घरातच बसले ! बदलत्या राजकारणात बदल घडवून आणला नाही, तर राजकारणात कुजून जाण्याचा योग येतो, आणि तेच नेमके नाथाभाऊंच्या नशिबी आले आहे. भरकटलेला हा वारू सध्या शरद पवार गटाच्या किनाऱ्यावर स्थिरावला आहे..ना पद हातात, ना कार्यकर्ता !

नक्कीच ज्येष्ठ.. काडीचा आधारही नाही !

कोणताही राजकीय पक्ष मोठा होत असताना अनेकांवर अन्याय होत असतात. पण, वाऱ्याचा रोख लक्षात घेऊन पावले टाकणारा यशस्वी होतो. नाथाभाऊंची पावले नेमकी उलट दिशेला पडली आणि ते त्यांना कळले सुद्धा नाही. विनोद तावडे, पंकजा मुंडे हे अन्याय झालेले दोन नेते पुन्हा मूळ रुळावर आले, पक्षात मोठा जम बसवला. पण, त्यांचे मार्गदर्शक नाथाभाऊ मात्र कायम अन्यायाच्या गर्तेतच चाचपडत राहिले. आता, तर वय झाले आहे आणि काहीही बोलले तरी त्याचा संबंध विरोधक म्हातारपणाशी लावतात ही वेळ आली आहे!

हेही वाचा  :  माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मंतरलेल्या दिवसांचा उजाळा

शरीर आणि मन, दोन्हीही लंगडेच !

कोणी अडचणीत आले की सल्ला न देणारा आळशी.. तशी नाथाभाऊंची अवस्था झाली आहे. नाथाभाऊ, लंगडत धावणाऱ्या बैलाने शंकरपटात भाग घ्यायचा नसतो, असा एकाने सल्ला दिला आहे. शरीराचा तंबू.. तोंडाचा चंबू झालेल्या वृद्धाने सुंदर तरुणीशी लग्नगाठ बांधायची नसते किंवा भसाड्या आवाजाच्या एकाद्या म्हातारीने मला आमच्या गावातली लता मंगेशकर म्हणतात, अशी थाप मारायची नसते ! असे डायलॉग जळगावमध्ये सर्रासपणे मारले जातात, ते नाथाभाऊंना उद्देशून !

प्रत्येक वेळी चुकीचेच धोरण कसे?

नाथाभाऊ, हे ज्यावेळी पाऊल उचलतात, ते नेमके चुकीचेच कसे काय, हा एक न सुटणारा प्रश्न आहे. राजकीय धोरण मांडताना, नव्याने पुन्हा तोरण बांधताना घेतलेली भूमिका चुकीचीच कशी काय हो नाथाभाऊ ? उपयोग शून्य असतांना आणि चारही बाजूंनी अपयशाने खचाखच भरलेले असताना चार पावले मागे घेत खुबीने राजकीय शत्रुत्व संपविण्याची मोठी गरज असते, असे वाटत नाही का?

महाजन कुठल्या कुठे पोहोचले ?

गेल्या अनेक वर्षांपासून ज्याच्या नेतृत्वाने खानदेशच्या पंचक्रोशीत मोठी झेप घेतली आहे, त्या गिरीश महाजन यांना ऊठसूठ डिवचण्याचे, खिजवण्याचे फाजील प्रयोग तुम्ही थांबवायची गरज असतांना तुम्ही मात्र, बुडत्याचा पाय खोलात पद्धतीची चुकीची भूमिका स्वीकारता आणि मुख्य राजकीय प्रवाहातून आणखी बाजूला फेकले जाता, हे कधी लक्षात आले नाही का हो? तुम्ही फडणवीस, महाजनांच्या दिशेने मारलेले सारेच बाण निष्प्रभ ठरलेले आहेत, तरीही गप्प न बसता तद्दन थापाड्या अशा एखाद्या पत्रकाराने टाकलेल्या खोट्या व्हीडिओचा आधार घेत काहीतरी सनसनाटी उडवण्याचा तुम्ही प्रयत्न करता, किती हे चीप?

म्हातारपणी पोरकट प्रयत्न..

राजकीय मळमळ आणि खळबळ माजविण्याचा तुमचा पोरकट प्रयत्न पाहून त्यावर हसावे की रडावे, हेच नेमके जळगाव, धुळे, नाशिक परिसरातील मतदारांना अजिबात समजेनासे झाले आहे. तुमच्याकडे महाजनांना अडचणीत आणण्यासाठी पुरेसे पुरावे नाहीत. याचा अर्थ महाजन पुरावे नष्ट करतात, असे नाही तर भानगडी करायलाच त्यांच्याकडे वेळ नाही. अगदी तुमच्याही भानगडींचे पुरावे त्यांच्याकडे असूनही त्यांना ते बाहेर काढून तुमचे वृद्धत्व अधिक क्लिष्ट करावे, असे मनातून अजिबात वाटत नसावे, हे लक्षात घ्या.

कितीतरी गूढ गोष्टी आणि भंबेरी !

समजा, महाजनांनी पत्रकार परिषद घेत जर तुमच्या मुलाचा संशयास्पद मृत्यू आणि तुमच्या पत्नीने तुम्हाला किडनी दान केलेलीच नाही, तर ज्याने ती दान केली, तो वीस वर्षांचा तरुण त्यातून मृत्यू पावला, यापद्धतीने एका पाठोपाठ एक आरोप तुमच्यावर केले, तर प्रकरण कोणत्या थराला जाईल, याची नुसती कल्पना करा!

नाथाभाऊ, शांत राहा, हा सबुरीचा सल्ला. त्या महाजन यांच्यावर उगाच खोटे आरोप करू नका, नाहीतर त्या महाजनांच्या पाठीशी संपूर्ण सरकार आहे, तुम्ही एकाकी आहात..ज्या पक्षात तुम्ही आहात त्यांच्याकडे देखील तुम्हाला वाचवण्याची ताकद नाही हो !

बोलण्यामागे नुसते उसने अवसान..

तुमच्या डरकाळ्या आता वाघाच्या नसून ती गाढवाची किंकाळी वाटत आहे, तुमचे बोलणे म्हणजे उसने अवसान आहे, मीडियाच्या ते लगेच लक्षात येते, म्हणूनच विधानसभा निवडणुकीत तुम्ही जेव्हा जामनेरात जाऊन मी गिरीश महाजन यांचे डिपॉझिट जप्त करून येईन, असे म्हणाला त्यावेळी कोणीही त्याची दखल घेतली नाही. कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक पटींनी मते घेत गिरीश महाजन निवडून आले. मुलाकडे तुमचे दुर्लक्ष झाले, त्यातून त्याने आत्महत्या करणे पसंत केले.. निदान त्यानंतर आपले राजकीय अस्तित्व निर्माण करून सत्तेत स्थान मिळविणाऱ्या आणि मोठे मन ठेवून ज्याने स्नुषा रक्षा यांना सत्तेत स्थान मिळवून देण्यात मोलाची महत्वाची भूमिका बजावली, त्या गिरीश महाजन यांना तरी वारंवार न डिवचण्याचे कार्य तुमच्या हातून घडावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे.

विधवा सुनेच्या ताटातही विष..

थेट विधवा सुनेच्या ताटातही विष कालवण्याची तुमची विचित्र आणि विक्षिप्त भूमिका केवळ गिरीश महाजनांच्या द्वेषापोटी आहे हे स्पष्ट दिसते. नकळत तुम्ही कुटुंब सदस्यांच्याही मनातून उतरत आहात.

दगाफटका करण्याचा मूळ स्वभाव

भाजपामध्ये प्रवेशास नकार कळवताच पुन्हा तो दगाफटका करण्याचा स्वभाव उफाळून वर आणायचा, त्यातून संघ आणि भाजपामधल्या प्रत्येकाची तुमच्या प्रति असलेली सहानुभूती केव्हाच संपलेली आहे, तुम्हाला राजकारणात पुन्हा पूर्वीचे वैभव म्हणजे एखाद्या मृतदेहाच्या मनात, मी पुन्हा उठून पूर्वीसारखा चालायला लागेन, असे येण्यासारखे ! जेथे आता तुम्हाला तुमच्या विधानसभा मतदारसंघात तुमच्या गावात यश नाही, ज्याचे परिणाम तुमच्या कन्येला विनाकारण भोगावे लागत आहेत, उगाच आगपाखड करून आता यापुढे काडीचाही उपयोग नाही, हे सुद्धा तुमच्या लक्षात येत नाही का हो ?

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button