माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात मंतरलेल्या दिवसांचा उजाळा
शिक्षण विश्व; व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी स्नेहमेळावा २०२५

पिंपरी | प्रतिनिधी
तब्बल ५५ वर्षांनंतर शाळेत पुन्हा येण्याचा अनुभव घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेतील मंतरलेल्या दिवसांना उजाळा देत आपल्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. अनेक माजी विद्यार्थ्यांनी जुन्या काळातील प्रसंग, शिक्षकांची काढलेली खोड याचीही आठवण यावेळी करून दिली.
निमित्त होते चिंचवड येथील व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये पार पडलेल्या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा २०२५ कार्यक्रमाचे. या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने अनेक विद्यार्थी तसेच शिक्षकही भाऊकझालेले पाहायला मिळाले.
चिंचवड, श्रीधरनगर येथील व्ही. के. माटे हायस्कूलमध्ये १९७० ते १९९० व १९९१ ते २००० या वर्षी शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थाचा स्नेहमेळावा संपन्न झाला.
हेही वाचा : विराट कोहलीने रचला इतिहास: टी-२० क्रिकेटमध्ये १३ हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज
शाळेतील सर्व माजी विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना एकत्र आणून त्यांचे अनुभव शेअर करणे, शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा समृद्ध अनुभवाचा उपयोग सध्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व्हावा या उद्देशाने हा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात दोनशे हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच त्या बॅचला शिकविणारे आजी व माजी शिक्षकांनाही आमंत्रित केले होते.
माजी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी शाळेतील अनुभव सांगितले. शाळेने दिलेल्या संस्कारामुळे, इतर उपक्रमामुळे सध्या माजी विद्यार्थी कशाप्रकारे यशस्वी झाले आहेत हे सांगताना सर्वाचे मन भरून आले. कार्यक्रम संपल्यावर सर्वांनी शाळेची एक टूर केली.
शाळेच्या संचालिका इंद्रायणी माटे पिसोळकर व प्राची धन्वंतरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मोरया शिक्षणा संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील शेडगे, सदस्य अभिषेक देव, प्रतिभा कुलकर्णी उपस्थित होते. नवीत झेंडे, प्रितम येवले, ऋषिकेश संकपाळ, सचिन देशपांडे, सागर शिंदे, सुरेंद्र कुलकर्णी, अभिजीत वाडेकर, भाग्यश्री पंडित या यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.