महापालिकेकडून मोफत लस, शहरात सव्वा दोन लाख मुलांना मिळाली ‘जेई’ ची लस
एक महिन्यात २ लाख २६ हजार मुलांना लस देण्यात आली

पुणे : जॅपनीज एन्सेफेलायटीस (जेई) सारख्या गंभीर आजारापासून संरक्षण करण्यासाठी शहरात १ ते १५ वयोगटातील मुला-मुलींसाठी ‘जेई’ ची लस देण्यात येत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने १ मार्च पासून मुला-मुलींसाठी लसीकरण मोहीम सुरू केली असून या मोहिमेअंतर्गत महिनाभरात (ता. २६) २ लाख २६ हजार मुला– मुलींना लस दिली गेली आहे. परीक्षा, सुट्ट्यांमुळे येतोय लसीकरणात अडथळा येत असल्याने लसीकरण मोहीम धीम्या गतीने सूरू आहे. ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
जपानी एन्सेफलायटीस (जेई) याला विषाणूजन्य मेंदूज्वर असेही म्हणतात. तो क्यूलेक्स मच्छरांच्या चाव्यापासून दुसऱ्याला पसरतो. हा आजार मेंदूवर परिणाम करून गंभीर मेंदूविषयक समस्या किंवा मृत्यूही होऊ शकतो. यासाठी ‘जेई’ लसीकरण आवश्यक आहे. शहरातील सुमारे १० लाख ४३ हजार ४२० मुलांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही लसीकरण सत्रे प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी केंद्रे आणि समुदाय केंद्रांमध्ये आयोजित केली जात आहेत. महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या माध्यमातून एकूण ६ हजार ६९२ लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत ५२२ लस टोचणारे कर्मचारी, ३६५ आशा कार्यकर्त्या १ हजार ९२ अंगणवाडी सेविका आणि ८४८ शिक्षक शिक्षिका यांचा सहभाग आहे.
हेही वाचा – श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास, भाविकांची बाप्पाचं दर्शन घेण्यास अलोट गर्दी
लसीकरणातही मुलींचीच बाजी
कोणत्याही मोहिमेत किंवा लसीकरणात मुलांची संख्या जास्त असते. मात्र या मोहिमेत मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या जास्त आहे. शहरात आतापर्यंत १ ते १५ वयोगटातील एकूण २ लाख २६ हजार ३८७ मुला – मुलींचे लसीकरण झालेले आहे. त्यापैकी १ लाख ९६५ मुलांना तर १ लाख ५ हजार ९५५ मुलींना हा डोस दिला आहे. यातून या मोहिमेत मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे.
लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी, पालकांनी आपल्या मुलांना या लसीकरणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे. अधिक माहितीसाठी, आपल्या जवळील शाळा, अंगणवाडी केंद्र किंवा पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. राजेश दिघे यांनी केले आहे.
लसीकरण आकडेवारी
लसीकरण उद्दिष्ट ः १० लाख ४३ हजार
राज्याकडून मिळालेली लस ः ६ लाख ७९ हजार
आतापर्यंत झालेले लसीकरण ः २ लाख २६ हजार
शिल्लक लस ः ४ लाख ४९ हजार
राज्याकडून मिळालेल्या सुया ः ८ लाख
वापरलेल्या सुया ः २ लाख ३३ हजार
शिल्लक सुया ः ५ लाख ६६ हजर