श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास, भाविकांची बाप्पाचं दर्शन घेण्यास अलोट गर्दी

पुणे : रांगोळीच्या पायघड्या आणि फुलांची आकर्षक आरास, बँडचे मंगलध्वनी अशा मंगलमय वातावरणात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गुढीपाडवा साजरा करण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ४१ व्या वर्धापनदिनी गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आलेल्या भव्य गुढीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पहाटेपासूनच चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी गणरायाचे दर्शन घेण्याकरीता पुणेकरांनी मोठया संख्येने गर्दी केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सपत्नीक गणरायाला अभिषेक केला. तसेच आरती करून गुढीपूजन करीत त्यांच्या हस्ते गुढी उभारण्यात आली.
हेही वाचा – पिंपरीतील वाहतूककोंडी सोडवण्यासाठी ‘एमआयडीसी’च्या जागा ताब्यात घेणार
यावेळी परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ घोडके, विलास रासकर, पोलीस अधिकारी विजयमाला पवार यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरबार बँड मधील कलाकारांनी गणरायाचरणी सेवा अर्पण केली. यावेळी गणेशयाग, अभिषेकांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अमितेश कुमार म्हणाले, पुणेकरांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. पुणे शहर शांत रहावे, शहरात कायदा सुव्यवस्था चांगल्या स्थितीत आहे. पुढील काळात देखील ती चांगल्या स्थितीत राहिल, असा विश्वास आहे. शांतता आणि चांगल्या वातावरणात प्रत्येकाचे आयुष्य असावे, हीच प्रार्थना त्यांनी केल्याचे त्यांनी सांगितले.