शिवस्मारक मशालीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन झाल्यानंतर मूक पदयात्रेस प्रारंभ
हजारो तरुणांनी मूक पदयात्रेत अनवाणी सहभाग घेत महाराजांना आदरांजली वाहिली

सोलापूर : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान सोलापूरतर्फे मूक पदयात्रेद्वारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा बलिदान मास पूर्ण करण्यात आला. हजारो तरुणांनी या मूक पदयात्रेत अनवाणी सहभाग घेत महाराजांना आदरांजली वाहिली.
श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथून मूक पदयात्रेसाठी मशाल प्रज्वलित करून आणण्यात आली होती. शिवस्मारक येथे मशालीचे आणि भगव्या ध्वजाचे पूजन झाल्यानंतर मूक पदयात्रेस प्रारंभ झाला. शिवस्मारकपासून निघालेली मूक पदयात्रा भागवत चाळ, बाजी अण्णा मठ, पत्रा तालीम, सळई मारुती, वडार गल्ली, बाळीवेस, टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, सोन्या मारुती, दत्त चौक, राजवाडे चौक, चौपाड विठ्ठल मंदिरमार्गे डाळिंबीआड मैदानात विसर्जित झाली.
हेही वाचा – श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गुढीपूजन व फुलांची भव्य आरास, भाविकांची बाप्पाचं दर्शन घेण्यास अलोट गर्दी
या ठिकाणी धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराजांना पुष्पहार घालून बलिदान दिवसानिमित्त सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रेरणामंत्राने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी श्री संभाजीसूर्यहृदय श्लोकमालिका सामूहिकरीत्या म्हणण्यात आली. यावेळी धारकरी वैभव कुलकर्णी यांनी ”धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज बलिदान मास” या विषयावर मार्गदर्शन केले. ध्येयमंत्राने कार्यक्रमाचा समारोप झाला.