‘अमली पदार्थांच्या विक्रीची माहिती देणाऱ्यास मिळणार बक्षीस’; मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

पुणेः कोथरुड येथील हुतात्मा चौकात अमली पदार्थमुक्त युवा पिढीसाठी विविध संघटनांच्या वतीने निर्दशिने करण्यात आली. यामध्ये कोथरूडकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित शंखनाद केला. शिवाजी रायगड स्मारक, अंकुर प्रतिष्ठाण, शिवश्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, अग्रेसर आदी संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
अमली पदार्थ विक्रीची माहिती देणाऱ्याला दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. तसेच व्यसनाधीन व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येईल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
अमली पदार्थांचा वाढता वापर सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे. अमली पदार्थ विरोधी लढा अधिकाधिक तीव्र करण्यासाठी आपण सर्वांनीच कटिबद्ध झाले पाहिजे. कोथरुड हे माझं घर असल्याने माझं घर स्वच्छ ठेवण्यासाठी मी आणि नागरिकांनी एकत्र येऊन “अमली पदार्थमुक्त कोथरुडचा” संकल्प केला असल्याचे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
हेही वाचा – होळी, धूलिवंदनानिमित्त पुण्याहून १३ विशेष रेल्वे गाड्या सुटणार; जाणून घ्या कसे आहे वेळापत्रक
कोथरूडमधील नागरिकांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या अमली पदार्थ विरोधी चळवळीत सामान्य नागरिक म्हणून सहभागी झालो आहे. सांगली सारख्या जिल्ह्यातील अमली पदार्थांचे साठे जप्त होत आहेत. त्यामुळे सांगलीचा पालकमंत्री या नात्याने विविध उपाययोजना केल्या जात असल्याचे पाटील म्हणाले.
अमली पदार्थ विक्रीबाबत खात्रीशीर माहिती देणाऱ्यांना वैयक्तिकरित्या दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले जात आहे. कोथरूडमध्येही अमली पदार्थ विक्रींची माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे हे देखील यावेळी उपस्थित होते.