कोरेगांव पार्क येथे ३९ अंश से. तापमान

पुणे : अवकाळी पाऊस गायब होताच शहरासह जिल्ह्यातील कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ झाली. परिणामी, शनिवारी (दि. ५) सकाळपासून शहरात उन्हाचा चटका जाणवू लागला. कोरेगांव पार्क येथे सर्वाधिक ३९ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील आठवड्यात उन्हाचा चटका वाढणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरवातीला सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला. कमाल तापमानात चार ते पाच अंशाने घट झाल्यामुळे हवेत गारवा पसरला. मात्र, गेल्या २४ तासांत हवामान कोरडे आणि पाऊस गायब झाल्यामुळे कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरवात झाली.
हेही वाचा – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉ.घैसास यांच्यावर गुन्हा दाखल करा; आमदार अमित गोरखे यांची मागणी
आज सकाळपासून आकाश निरभ्र आणि लख्ख ऊन असल्यामुळे दुपारी उन्हाचा चांगलाच चटका जाणवत होता. पावसामुळे ३६ अंशापर्यंत खाली गेलेले कमाल तापमान आज ३९ अंशावर पोहचले.
कोरेगांव पार्कसह शिवाजीनगर, पाषाण आणि हडपसर परिसरात येथे ३८, चिंचवडमध्ये ३७.८, वडगांवशेरी ३७.१, मगरपट्टा ३७, एनडीए ३६.८, माळीण ३५.८, हवेली ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान, पुढील दोन दिवस शहरासह जिल्ह्यातील हवामान कोरडे, आकाश निरभ्र तर कमाल तापमानत काही अंशी वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.