‘पीएमआरडीए’ला जागा हस्तांतरित करण्याऐवजी वापरास दिली जाणार

देहूगाव : देहू नगरपंचायतीच्या सभागृहात शुक्रवारी नगराध्यक्षा पूजा दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली. नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांची बदली झाल्याने प्रभारी मुख्याधिकारी डॉ. प्रविण निकम, उपनगराध्यक्ष, विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक-नगरसेविका, नगरपंचायतीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. या सभेत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
देहू नगरपंचायतीच्या लेखा, पाणीपुरवठा, कर विभागातील संगणक प्रणालीचे देयक अदा करणे, कामगार विमा, इपीएफ व इएसआयसी अनुषंगिक व आर्थिक वर्षातील कर भरण्याकरिता सल्लागार नेमणूक करणे, राज्य क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या खर्चास मान्यता, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता यांचे वैद्यकीय देय देणे, आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाइपलाइन, ड्रेनेज लाइन, रस्ता रुंदीकरण, व्यायाम शाळा सुशोभीकरण करण्याच्या विषयास सभेत मंजुरी देण्यात आली.
हेही वाचा – कोरेगांव पार्क येथे ३९ अंश से. तापमान
तसेच विविध विकास कामांसाठी गायरान जमीन उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास पार्किंगसाठी जागा हस्तांतरित न करता वापरास देणे बाबत निर्णय बैठकीत घेण्यात आला. यासह इतरही अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
याप्रसंगी देहू नगरपंचायतीच्या वतीने श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या नवनिर्वाचित विश्वस्तांचा शाल व पुष्पगुच्छाने सन्मान करण्यात आला. तसेच संत जिजाबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी समृद्धी पवार (इ. ८वी), अनुजा काटे (इ. ६वी) यांचा कोल्हापूर येथे महाराष्ट्र शासन आयोजित राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत जिल्हास्तरीय संघातून चमकदार कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला होता, त्यातील खेळाडूंचा, शिक्षकांचा नगरपंचायतीकडून सन्मान करण्यात आला.