ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जगतापांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’!

पुनावळे कचरा डेपोचा मुद्दा : कलाटेंच्या ‘होमपीच’वर

ग्राऊंड रिपोर्ट: आमदार अश्विनी जगताप, शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मारली बाजी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील चिंचवड विधानसभा मतदार संघातील राजकीय पटलावर २००८ पासून कळीचा प्रमुख मुद्दा असलेल्या प्रस्तावित पुनावळे कचरा डेपोचे आरक्षण रद्द करून आमदार अश्विनी जगताप आणि भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी बाजी मारली. विधानसभा सभागृहात मांडलेली लक्षवेधी, महापालिका, राज्य शासनाकडे केलेला पाठपुरावा यामुळे जगताप कुटुंबियांना याचे राजकीय श्रेय मिळाले. परिणामी, माजी नगरसेवक व विधानसभा निवडणुकीतील तीव्र दावेदार राहुल कलाटे ‘बॅकफूट’ गेले आहेत.

दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना २०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत तगडे आव्हान उभा करणारा नेता म्हणून राहुल कलाटे यांची ओळख आहे. २०१४ मध्ये शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावर आणि २०१९ मध्ये ‘बॅट’ चिन्हावर कलाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. या दोन्ही निवडणुकांमध्ये कलाटे मतदार संघात स्वत:ची ‘स्पेस’ निर्माण करण्यात यशस्वी झाले होते. तत्पूर्वी, २०१७ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत ताथवडे-पुनावळे-काळाखडक-वाकड अशा प्रभागामध्ये त्यावेळी बलाढ्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीशी दोन हात करीत शिवसेनेच्या तिकीटावर तीन जागा म्हणजे रेखा दर्शिले, अश्विनी वाघमारे आणि स्वत: राहुल कलाटे निवडून आले होते. भाजपा आणि राष्ट्रवादीची मोठी ताकद असतानाही या भागातील नागरिकांनी कलाटे यांच्या पॅनेलला पसंती दिली होती. त्यामुळे राहुल कलाटे पुनावळे कचरा डेपोबाबत सर्वात आक्रमकपणे भूमिका मांडतील, असे अपेक्षीत होते. मात्र, तसे झाले नाही.

दरम्यान, दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवार अश्विनी जगताप, महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे रिंगणात होते. कलाटे यांनी निर्णायक मते खेचली होती. त्यानंतर संधी असतानाही कलाटे पुनावळे कचरा डेपोच्या मुद्यावर आग्रही झालेले पहायला मिळाले नाही. विशेष म्हणजे, पुनावळेतील सोसायटीधारक, स्थानिक ग्रामस्थ यांनी वेळोवेळी केलेल्या आंदोलनांमध्ये राहुल कलाटे किंवा राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मयूर कलाटे अपवाद वगळता कुठेही पहायला मिळाले नाहीत.

याउलट, आमदार अश्विनी जगताप यांनी कलाटे यांचे ‘होमपिच’ असलेल्या ताथवडे-पुनावळे-काळाखडक आणि वाकड प्रभागातील पुनावळे कचरा डेपोचा प्रश्न निकालात काढला. त्यामुळे सोसायटीधारकांसह ग्रामस्थांच्या ‘गुडबॉक्स’मध्ये जगताप कुटुंबियांनी स्थान मिळवले आहे. याचा फटका कलाटे यांना आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत बसेल. कारण, पुनावळे आणि परिसरातील सुमारे २० हजार मतदार यामुळे प्रभावीत झाले आहेत, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट घेतली पण…
दुसरीकडे, ‘‘पुनावळेत झालेल्या प्रचंड शहरीकरण आणि नागरीकरणाच्या धर्तीवर हा कचरा डेपो किती घातक आणि हानिकारक आहे याबाबत चर्चा करण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याचे कलाटे यांनी ‘सोशल मीडिया’द्वारे म्हटले आहे. त्याचवेळी डेपो रद्द होणार असा दावा कलाटे यांनी केला असता, तर कदाचित त्यांना श्रेय मिळाले असते. पण, उदय सामंत यांनी आमदार अश्विनी जगताप यांच्या लक्षवेधीला उत्तर दिले. त्यामुळे हा विषय राजकीयदृष्टया जगताप यांनी ‘क्रेडिट’ केला. सातत्याने या विषयावर पाठपुरावा केला. कलाटे यांना संधी असतानाही त्यांना हा विषय यशस्वीपणे हाताळता आला नाही. परिणामी, कलाटेंच्या ‘होमपीच’ वर जगतांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

नाना काटे यांचीही संधी हुकली..!
राज्यात महायुतीची सत्ता आहे. २००८ साली पुनावळेत कचरा डेपोचे आरक्षण निश्चित करण्यात आले. त्यावेळी महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निर्विवाद वर्चस्व होते. राज्यात आघाडी सरकार होते. २०१७ पर्यंत महापालिकेत सत्ता होती. २०१९ मध्ये महाविकास आघाडीची सत्ता आली. त्या अडीच वर्षांतही नाना काटे यांना पुनावळे कचरा डेपो रद्द करुन राजकीय भवितव्याच्या दृष्टीने हा विषय ‘क्रेडिट’ करता आला असता. मात्र, नाना काटे केवळ पत्रक, निवेदन आणि मागणी इथपर्यंतच मर्यादित राहीले. चिंचवड पोटनिवडणुकीत पुनावळे भागात सर्वाधिक मते नाना काटे यांना मिळाली आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत. महायुती सरकारमध्ये सत्तेत सहभागी असतानाही पुनावळे कचरा डेपोचे श्रेय भाजपाला मिळाले. नाना काटे यांची संधी हुकली, ही वस्तुस्थिती आहे.

तुषार कामठे यांचा चिंचवडच्या रिंगणात चंचूप्रवेश…
पुनावळे कचरा डेपोच्या मुद्यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात चंचूप्रवेश केला आहे. कचरा डेपोविरोधात सोसयटीधारक आणि स्थानिक नागरिकांनी बाईक रॅली काढली होती. या रॅलीमध्ये सुमारे ७ हजार दुचाकीस्वार सहभागी झाले होते. त्यावेळी तुषार कामठे यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. लोकभावना लक्षात घेत कामठे यांनी थेट महापालिका प्रवेशद्वारावर साखळी उपोषण सुरू केले. विशेष म्हणजे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून कामठे यांनी हिवाळी अधिवेशनात पुनावळे कचरा डेपोच्या विषयाकडे लक्ष वेधले. आगामी २०२४ च्या निवडणुकीत या मतदार संघातून भाजपा विरोधातील ‘स्पेस’ भरुन काढण्याची संधी यानिमित्ताने तुषार कामठे यांना मिळेल, असेही निरीक्षण राजकीय जाणकार नोंदवतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button