‘हो, मी नाराज आहे’; मंत्रिपद नाकारल्यानंतर छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal | राज्यातील महायुती सरकारचा काल नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहर्याना संधी देण्यात आली. मात्र अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. दरम्यान, मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा कालपासून रंगत होत्या. अखेर आज (१६ डिसेंबर) छगन भुजबळ यांनी त्यांची नाराजी उघड केली.
छगन भुजबळ म्हणाले, की मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावललं काय नि फेकलं काय… कोणाला काय फरक पडतो. आयुष्यात मंत्रिपद किती वेळा आलं आणि किती वेळा गेलं, परंतु हा छगन भुजबळ संपला नाही. तुम्ही मंत्रिपदावरून मला प्रश्न विचारण्याऐवजी ज्यांनी डावललं त्यांना विचारायला हवं.
हेही वाचा – ‘संजय राठोड यांना कायम आपला विरोध राहील’; चित्रा वाघ यांचं वक्तव्य
छगन भुजबळ यांना तुम्ही पक्षावर नाराजा आहात का? यावर ते म्हणाले, होय, मी नाराज आहे. पुढे काय करणार? मी पुन्हा सांगतो मी नाराज आहे. यानंतर त्यांना विचारण्यात आलं की तुमचं अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्याशी बोलणं झालं आहे का? यावर ते म्हणाले, मला त्याची काही आवश्यकता वाटली नाही.
पुढची भूमिका काय असेल? असा प्रश्न विचारल्यानंतर भुजबळ म्हणाले, मी माझ्या लोकांशी बोलेन, माझ्या मतदारसंघातील जनतेशी, माझ्या कार्यकर्त्यांशी, समात परिषदेतील लोकांशी बोलून पुढची भूमिका ठरवेन.