देहूरोडपर्यंत मेट्रो रेल्वेचा विस्तार करण्याची मागणी

पिंपरी : देहूरोड ते निगडी मेट्रो रेल्वे प्रकल्प सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) देहूरोड शहर युवकाध्यक्ष आशिष बन्सल यांनी मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तीर्थक्षेत्र देहूगाव येथे वर्षातून तीनदा यात्रेच्या निमित्ताने लाखो भाविक येत असतात. तर प्रतिदिनी हजारो भाविक व पर्यटक देहूत येत असतात. यासह धम्मभूमी, दीक्षाभूमी, चैत्यभूमी असा त्रिवेणी संगम असणाऱ्या देहूरोड शहरातील वर्षभर बौद्ध बांधव व पर्यटक येथे येतात.
हेही वाचा – मंत्रिमंडळातून ‘या’ ११ दिग्गजांचा पत्ता कट; कोणाकोणाला वगळलं?
देहूरोड व निगडी या दोन्ही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. मेट्रो रेल्वेमुळे या दोन्ही भागातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या वेळेची, पैशाची बचत होईल. मेट्रो रेल्वेमुळे खासगी वाहनांची संख्या कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होईल. मेट्रो रेल्वे ही पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्था असल्यामुळे प्रदूषण कमी होईल. मेट्रोमुळे शहराचा सर्वसमावेशक विकास होईल. त्यामुळे देहूरोडपर्यंत मेट्रो सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निगडी येथील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. अशावेळी जवळच अडीच किमी अंतरावर असणाऱ्या देहूरोडपर्यंत मेट्रो प्रकल्पाचा विस्तार करण्यात यावा. याचा सर्व प्रवाशांना आणि परिसराला मोठ्या प्रमाणात लाभ होईल. त्यामुळे देहूरोड पर्यंत मेट्रो करावी, अशी मागणी आमदार शेळके यांच्याकडे आशिष बन्सल यांनी केली आहे. यावेळी शहराध्यक्ष प्रविण झेंडे, अतुल मराठे, जालिंदर राऊत उपस्थित होते.





