‘सोलापूरकर, कोरटकर मोकाट, अन् औरंगजेबावरून दंगली’; उद्धव ठाकरेंची टीका

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात औरंगजेबाच्या कबरीच्या प्रकरणावरून चांगलंच राजकारण तापलं आहे. यातच नागपूरमध्ये १७ मार्च रोजी औरंगजेबाच्या कबरीवरून दंगल झाल्याची घटना घडली. यावर आता महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. शिवसेनेचे (ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी बोलत असताना महायुती सरकारवर जोरदार टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारे राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर आणि माजी राज्यपाल कोश्यारी हे मोकाट सुटले. पण इथल्या लोकांमध्ये औरंगजेबावरून दंगली लावल्या जात आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, की गुजरातमध्ये जन्माला आलेल्या औरंगजेबाविरोधात छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून त्याला नमवत हिंदवी स्वराज्य स्थापन केले होते. महाराजांच्या निधनानंतर औरंगजेब त्या स्वराज्यावर चालून आला होता. औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला होता. पण तो महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही. महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, महाराणी ताराराणी आणि असंख्य मावळ्यांनी स्वराज्याचा लढा सुरू ठेवला. थोडक्यात काय तर गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्राची माती जिंकू शकला नाही. पण महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचे समर्थन कुणीही शिवप्रेमी करणार नाही.
हेही वाचा : वृक्ष संवर्धन विभागाचे शिलकी अंदाजपत्रक मंजूर
जे लोक औरंगजेबाचे थडगे उखडून टाकण्याची भाषा वापरत असेल तर त्यांनी नुसते आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार नुसती वाफ सोडण्यासाठी आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबर नष्ट करण्यासाठी असमर्थतता दाखवली असून त्याला केंद्राचे संरक्षण आहे. म्हणजे केंद्र सरकार औरंगजेबाच्या थडग्याला संरक्षण देणार असेल तर आम्ही भाजपाला विचारतो की, औरंगजेब तुमचा कोण लागतो? असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
औरंगजेब असो किंवा अफजल खान असो, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत. ते जर यांना नष्ट करावे वाटत असेल तर आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी पंतप्रधान मोदींकडे जावे. पंतप्रधान मोदींनी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या उपस्थितीत औरंगजेबाची कबर उध्वस्त करावी, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मागच्या जन्मात छत्रपती शिवाजी महाराज होते, असे विधान भाजपाच्या खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत केले. याचाही उद्धव ठाकरेंनी निषेध केला. भाजपाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना ऐऱ्यागैऱ्याशी करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या एकाला तरी भरचौकात फटकवला तर पुढे असले प्रकार होणार नाहीत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.