राज्यात औरंगजेबाचे उदात्तीकरण नको; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई | औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा अमानूष छळ केला. तो महाराष्ट्राला उध्वस्त करायला आला होता. त्याचे उदात्तीकरण कोणीही सहन करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना विधानसभेत व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशासाठी, धर्मासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिले. औरंगजेबाचा कंलक महाराष्ट्रातून पुसला पाहिजे. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे म्हणजे देशद्रोह असून त्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही, असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जे लोक औरंगजेबाच्या समर्थनासाठी पुढे येतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर राज्य सरकार काम करत आहे. गोरगरिबांना न्याय देण्याचे काम केले जात आहे. असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा : ‘सोलापूरकर, कोरटकर मोकाट, अन् औरंगजेबावरून दंगली’; उद्धव ठाकरेंची टीका
नागपूरमध्ये समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरमधील परिस्थिती नियंत्रणात आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.