‘कितीही डुबक्या मारा, गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला

मुंबई | जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि भगिनींनो. मी आता हे म्हटल्यावर उद्या पेपरमध्ये बातमी येणार उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. पण मी मागेही म्हटलं होतं. हिंदुत्व म्हणजे धोतर नाहीये सोडायला. गर्व से कहो हम हिंदू है ही घोषणा बाळासाहेब ठाकरेंनी दिली होती. गर्व से कहो है हिंदू है ही घोषणा तर आपली आहेच. पण मी म्हणतोय की अभिमानाने आणि स्वाभिमानाने म्हणा की मी मराठी आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
१९६६ मध्ये मराठी माणूस थकलेल्या मानसिकतेत होता. त्या काळोखात एक ठिणगी पडली त्याचा वणवा झाला ती ही शिवसेना. आज मराठी भाषा दिन आहे. काल महाशिवरात्र आहे, त्याआधी शिवजयंती झाली. आता गुढी पाडवा येणार. आपल्या फोनवर मेसेज येतील हॅपी गुढीपाडवा वगैरे. मला तर वाटतं आहे की शुभेच्छा मराठीत द्यायला पाहिजेत त्याची गरज आहे. या दिवशी कुसुमाग्रज यांच्या कविता आपण ऐकत असतो. मराठी भाषा गौरव दिन आपण उत्सवासारखा साजरा करतो. कुठेतरी एक चिंतेची किनारही लागली आहे. कारण गद्दारी करुन आपलं सरकार पाडल्यानंतर हमे मराठी नहीं आती हे आपल्याला ऐकून घ्यावं लागतं. असं जिथे ऐकू जाईल तिथे त्याच्या कानाखाली मराठीचा आवाज उमटला पाहिजे. महाराष्ट्र गीत वगैरे नुसतं ऐकत जायचं का आपण? ते वा वा करण्यासाठी नाही. त्या गाण्यात महाराष्ट्राचं वर्णन आहे त्याप्रमाणे वागा. तसं वागलो तर मराठी भाषेलाही आपला अभिमान वाटेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : मराठी भाषा जगवली, जोपासली पाहिजे, भाषेचा सन्मान केला पाहिजे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठी साहित्य संमेलन दिल्लीत पार पडलं. त्यात पंतप्रधान जे बोलले ते बोलले. पण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांच्या भाषणावर चर्चा व्हायला होती. मला त्यांचं भाषण आवडलं कारण राज्याला दिशा दाखवणारं ते भाषण होतं. मी जैविक नाही म्हणणाऱ्यावर आपण विश्वास ठेवायचा का? जो म्हणतो मला भगवान ने भेजा है त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो. साधू संतांनी आपल्याला जगावं कसं हे सांगितलं आणि दाखवून दिलं. भवाळकर यांनी कुंकू याबाबतही बोलल्या. माझ्या आजोबांच्या विचारांशी मिळतेजुळते त्यांचे विचार आहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
एका बाजूला आपण मंगळावर यान गेलं म्हणून आपण फटाके वाजवतो. मंगळवार यान उतरत असताना पृथ्वीवर आपण माणसाच्या पत्रिकेत मंगळ शोधत असतो. मंगळावर माणूस आणि माणसाच्या पत्रिकेत मंगळ नेमकं जायचं आहे कुठे तुम्हाला? चांगला नागरिक म्हणून जगायला शिकवणं म्हणजे संस्कार असतात. आत्ताही मला गंगेचं पाणी दिलं. नमामी गंगा वगैरे सगळं आहे. मी गंगेमध्ये जाऊन स्नान करुन आलो पण इकडे ५० खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारुन आलो त्याचा उपयोग काय? महाराष्ट्राशी गद्दारी करायची आणि तिकडे जाऊन डुबकी मारुन यायची. काहीही झालं कितीही डुबक्या मारल्या तरीही गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.