मराठी भाषा जगवली, जोपासली पाहिजे, भाषेचा सन्मान केला पाहिजे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मराठी भाषा गौरव दिनी उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते साहित्यिकांचा गौरव

मुंबई | मराठी भाषेवर प्रेम करणारे लोक जगभरात पसरलेले आहेत. परंतु काही मराठी माणसे एकमेकांना भेटल्यावर उगाच हिंदी, इंग्रजीत बोलतात. त्यामुळे जिथे शक्य असेल तिथे मराठीतच बोललं पाहिजे. जे जे मराठी आहे ते ते सर्व आपण जगवले पाहिजे, वाढवले पाहिजे, जोपासले पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.
मराठी भाषेच्या गौरवार्थ आणि भाषा व साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे गौरव व पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, आमदार डॉ.मनीषा कायंदे, मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी तसेच साहित्य क्षेत्रातील दिग्गज, नामवंत साहित्यिक, लेखक, प्रेक्षक उपस्थित होते. यावेळी मराठी भाषा विभाग अंतर्गत २०२४ करिता विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत रावसाहेब रंगराव बोराडे यांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कन्या श्रीमती प्रेरणा दळवी यांना प्रदान करण्यात आला. नामवंत प्रकाशन संस्थेसाठी २०२४ चा श्री.पु. भागवत पुरस्कार हा ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे या संस्थेला प्रदान करण्यात आला. डॉ.अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार २०२४ हा डॉ.रमेश सिताराम सुर्यवंशी यांना आणि श्री.मंगेश पाडगावकर भाषा संवर्धन पुरस्कार २०२४ हा श्रीमती भीमाबाई जोंधळे यांना प्रदान करण्यात आला.
उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणले की, आपल्या प्रत्येक वर्तनातून मराठीचा अभिमान जागवला पाहिजे. हिच खऱ्या अर्थाने माय मराठीची सेवा ठरेल. माय मराठीवर नुसते प्रेम करून भागणार नाही. तर मराठी साहित्य, नाटक, चित्रपट, लोककला, संगीत, खाद्य पदार्थ हे सगळं आपण टिकवले पाहिजे. मराठीत बोलणारा, मराठी ऐकणारा आणि मराठी कलांचा आदर करणारा मराठी समाज आपल्याला टिकवला पाहिजे, वाढवला पाहिजे. मराठीचा आग्रह धरण म्हणजे इतर भाषाचा द्वेष करणे असे नाही. भाषा ही आपली अस्मिता आहे, भाषा ही आपली ओळख आहे, भाषा आपला अभिमान आहे, भाषा हेच आपले अस्तित्व आहे. काळाच्या ओघात किती तरी भाषा नामशेष झाल्या आहेत. आपली भाषा संपली तर एक दिवस आपलं अस्तित्व संपेल. त्यामुळे भाषेचे जतन आणि संवर्धनाची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे. केवळ जबाबदारीच नाही तर ते प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य असल्याचे श्री.शिंदे म्हणाले.
हेही वाचा : ‘राज्याचे गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत’; संजय राऊत यांची कदमांवर टीका
उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, आता तर संगणक तंत्रज्ञान आलं, ज्ञान शाखांमधलं ज्ञानही मराठीत मिळतेय. आपली भाषा ही ज्ञान भाषा व्हायला हवी. ती व्यवहाराची भाषा झाली तर अजून समृद्ध होईल. मराठी भाषेचा व्यवहारात वापर केला पाहिजे. प्रसार, विस्तार, संवर्धन या चारही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून त्यासाठी भाषातज्ञांनी पुढाकार घेतला पाहिजे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी भरीव निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्य सरकार मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कटीबद्ध असून, निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. मराठी कवी सुरेश भट यांच्या ओळींना स्मरून, मराठी भाषा ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण जगभरातील मराठी जनांची ओळख आहे, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी नमूद केले.
उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, ज्येष्ठ साहित्यिक आणि प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अतिशय मोलाचे कार्य केले आहे. त्यांच्या समितीतील सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले असून, त्यांच्या योगदानाला संपूर्ण महाराष्ट्र कृतज्ञ असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने मराठी संस्कृती, भाषा आणि परंपरेचा अभिमान बाळगण्याचा संदेश देण्यात आला.