Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

To The Point : आश्चर्य आणि असहायता…! पिंपरी-चिंचवडमधील इच्छुक शिलेदारांचे सैन्य माघारी!

महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा सुटेना : पिंपरी, चिंचवड अन्‌ भोसरीत रस्सीखेच पोहोचली शिगेला

पिंपरी । विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा महायुतीविरोधात दोन हात करण्यासाठी गेल्या ३ महिन्यांपासून जोर-बैठका काढणारे आणि घरघरांत पोहोचलो आहे, असा दावा करणारे महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवार गेल्या तीन दिवसांपासून उमेदवारीसाठी मुंबई-पुण्यात ठाण मांडून बसले आहेत. १० वर्षे आमदार, २५ वर्षे नगरसेवक म्हणून काळ गाजवलेली ही मंडळी पक्षश्रेष्ठींच्या दारात तिकीट याचना करीत आहेत. ‘‘… ही वेळ का आली?’’ असा प्रश्न उपस्थितीत करीत राजकीय वर्तुळात आश्चर्य आणि नेत्यांची असहायता याबाबत चर्चा होवू लागली आहे.

भाजपा महायुतीकडून चिंचवडमधून भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप आणि भोसरीतून आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी घोषित झाली. पिंपरीतून राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांनाही प्रचंड विरोध असतानाही पक्षश्रेष्ठींनी तिकीट दिले. मात्र, या तिघांच्या विरोधात लढण्यासाठी तयारी करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पक्षश्रेष्ठींनी ‘वेटिंग’ वर ठेवले आहे. त्यामुळे इच्छुक नेत्यांनी आपले सैन्य माघारी पाठवले आहे.

भोसरीतून अजित गव्हाणे, रवि लांडगे, सुलभा उबाळे या महाविकास आघाडीतून इच्छुकांनी आपआपल्या पक्षश्रेष्ठींकडे ‘फिल्डिंग’ लावली आहे. तर चिंचवडमधून राहुल कलाटे, नाना काटे आणि भाउसाहेब भोईर यांच्यासह नुकतेच ठाकरे गटात प्रवेश केलेले मोरेश्वर भोंडवे देव पाण्यात ठेवून आहेत. चिंचवड आणि भोसरी या बड्या संस्थानांच्या मध्ये असलेले पिंपरी संस्थानामध्येही परिस्थिती तशीच आहेत. माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्यासह सीमा सावळे, सुलक्षणा शिलवंत, सचिन भोसले यांनी सर्व ताकद पणाला लावली आहे.

नेत्यांनी पॉलिटिकल क्रेडिब्लिटी गमावली?

निवडणूक हा आकड्यांचा खेळ आहे. उमेदवार ठरवताना त्याची विरोधी उमेदवारासमोर ‘‘निवडून येण्याची क्षमता’’ हा प्रमुख निकष असतो. या निकषाला खरा उतरणाऱ्या उमेदवारांचा ‘एबी फॉर्म’ अशी घरी येतो, असे राजकीय जाणकार सांगतात. शहरात २५-२५ वर्षे नगरसेवक असलेले, १० वर्षे आमदार म्हणून काम करणारे नेते स्वत:साठी एका झटक्यात तिकीट आणू शकत नाहीत. याबाबत आत्मचिंतन करावे लागेल. किंबहुना, कायम धरसोड वृत्तीचे राजकारण, अविश्वास, पक्षाला आणि नेत्यांना गृहित धरणे, पक्षनिष्ठेशी परतारणा करणे यासह पाच वर्षे मतदार संघामध्ये किंवा प्रभागामध्ये काम न करता केवळ निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मिती करणे यासारख्या हलगर्जीपणामुळे पक्षांकडून झालेल्या सर्वेमध्ये कामगिरी दिसत नाही. त्यामुळे पक्षश्रेष्ठीसुद्धा फारसे मनावर घेत नाहीत. त्यामुळे आश्चर्य आणि नेत्यांची असहायता दिसते, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

…. म्हणून पिंपरी-चिंचवडचा तिढा कायम!

मुंबई आणि पुण्यातील सूत्रांच्या माहितीनुसार, पिंपरी, चिंचवड आणि भोसरी यामधील एक जागा ‘मशाल’ आणि दोन जागा तुतारीला मिळणार आहेत. त्यापैकी कोणती जागा कोणत्या चिन्हावर लढणार आणि कुणाला संधी मिळणार… यासाठी जोरदार घोडेबाजार सुरू झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी चिंचवडमधील राहुल कलाटे यांच्यासाठी आग्रह धरला आहे. तर माजी आमदार विलास लांडे यांनी अजित गव्हाणे यांच्यासाठी बाजू लावून धरली आहे. दुसरीकडे, सुलक्षणा शिलवंत यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार श्रीनिवास पाटील यांनी साहेबांकडे ‘शब्द’ टाकला आहे. त्यामुळे पिंपरीची जागा निश्चित असून, भोसरी आणि चिंचवडमध्ये समझोता करा… असा पक्षश्रेष्ठींचा सल्ला आहे. मात्र, यावर एकमत होत नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे बहुतांशी जागावाटप झालेले असताना पिंपरी-चिंचवडचा पेच कायम आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button