वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी! HSRP नंबरप्लेट बंधनकारक, मुदतवाढ मिळणार नाही; कारवाई सुरुच राहणार, परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आदेश

HSRP number plate compulsory Maharashtra: “वाहनांच्या एचएसआरपी नंबरप्लेटसाठी आता कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही”, असे राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर कारवाई करण्यास एक जुलैपासून सुरुवात झाली असून, ही कारवाई सुरुच राहणार असल्याचेही मंत्री सरनाईक यांनी सष्ट केले. सरनाईक यांनी आज विधिमंडळाच्या आवारात माध्यमांशी बोलताना वाहनाधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेण्याचे आवाहन केले.
मुदतवाढ मिळणार नाही – मंत्री सरनाईक
“एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घेण्यासाठी पाचवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. डिसेंबर २०२४ मध्ये एचएसआरपी निविदा प्रक्रियेला वेग आला पैकी तीन निविदाकारांना हे काम देण्यात आलं होतं. महाराष्ट्रात दोन कोटी दहा लाख वाहने २०१९ पूर्वीच्या होत्या, त्या वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बंधनकारक करण्यात आली होती. काल यासाठी शेवटची मुदत होती, कालपासून याविरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या नंबरप्लेट महत्वाच्या असून, वाहनधारकांनी याला प्राधान्य देऊन नंबरप्लेट बसवून घ्याव्यात”, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.
हेही वाचा – गॅस सिलेंडर हरवले तर कनेक्शन रद्द? किती लागणार दंड? वाचा सविस्तर
५१ टक्के वाहनांना HSRP नंबरप्लेट नाही
“वाहनांच्या एचएसआरपी नंबरप्लेटसाठी आता कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही”, याचा पुनरुच्चार मंत्री सरनाईक यांनी केला. राज्यात अजून एक कोटी आठ लाखांच्या आसपास गाड्यांना एचएसआरपी नंबरप्लेट लावण्यात आलेली नाही. ३० जूनपर्यंत केवळ ४९ टक्के वाहनांनी एचएसआरपी नंबरप्लेट लावल्याची आकडेवारी उपलब्ध आहे तर ५१ टक्के वाहनांनी नंबरप्लेट लावली नसल्याचे माहिती आहे. त्यामुळे कारवाई सुरु झाली असून, ती सुरुच राहणार आहे”, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.
एचएसआरपी नंबरप्लेटसाठी आकारले जाणारे शुल्क देखील माफक आहे. यासाठी पारदर्शक पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एचएसआरपी नंबरप्लेट बंधनकारक आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तत्कालिन सरकारने याबाबतचा निर्णय घेतला होता आणि आम्ही देखील याला प्राधान्य दिले आहे. दंडात्मक कारवाईला एक जुलैपासून सुरुवात झाली असून, वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना केले.





