सुनेत्रा पवार RSS च्या कार्यक्रमात; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील प्रतिक्रिया

Ajit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (RSS) संबंधित ‘राष्ट्र सेविका समिती’च्या एका कार्यक्रमाला हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. हा कार्यक्रम भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचा फोटो समोर आल्यानंतर यावरून राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. दरम्यान यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
वर्धा येथील पत्रकार परिषदेत अजित पवारांना या कार्यक्रमाबद्दल विचारले असता अजित पवारांनी आपल्याला याबद्दल माहिती नसल्याचे उत्तर दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मी विचारतो. मला माहिती नाही. माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते ते मिनीट-मिनीट मला माहिती नसतं. मी आता विचारतो की, का गं कुठं गेली होती?असं खोचक उत्तर अजित पवार यांनी दिले.
हेही वाचा : ‘वेल्हे’ नव्हे आता ‘राजगड’; राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्राची मंजुरी
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी मात्र यावरून टीका केली आहे. जेव्हा ओबीसी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कमंडल यात्रा काय होती, हे आरएसएसच्या प्रमुखांना त्यांनी विचारलं पाहिजे. सत्तेत ते गेलेत, त्याची कारणं वेगळी आहेत. पण तिथं गेल्यानंतर त्यांचे विचार काही त्यांनी स्वीकारले नसतील. पण कुठेतरी त्यांच्यावर प्रेशर असेल की एखाद्या बैठकीला या, एखादा फोटो येऊद्या… म्हणजे हे आरएसएसचा विचार स्वीकारत असल्याचा संदेश जातो. एकाबाजूला तुम्ही पुरोगामी विचार म्हणता, एकाबाजूला चव्हाण साहेबांचे, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव घेता आणि दुसरीकडे आरएसएसच्या बैठकीला तुम्ही किंवा तुमचे प्रतिनिधी जात असतील, तर ही दुटप्पी भूमिका आहे आणि आज राजकारणात लोकांना दुटप्पी भूमिका नकोय, असे रोहित पवार म्हणाले.




