राज ठाकरेंना धक्का? मोठा नेता पक्षावर नाराज, एका पोस्टमुळं चर्चेला उधाण

Vibhav Khedekar : महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. स्थानिक पातळीवरचे नेते, माजी नगरसेवक आपली राजकीय सोय लक्षात घेऊन पक्षांतर करत आहेत. असे असतानाच आता मनसेच्या गोटातून एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टनंतर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
वैभव खेडेकर यांनी त्यांच्या फेसबुक खात्यावर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमद्ये निष्ठावंतांना पक्षात कवडीचीही किंमत नसते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. ही पोस्ट करून त्यांनी एका प्रकारे आपली नाराजीच जाहीर केली आहे.
हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थाचे बिगुल लवकरच वाजणार; राज्य निवडणुक आयोगाच्या सरकारला महत्वाच्या सुचना
काही दिवसांपूर्वी खेडमध्ये एका मंदिराचा कलशरोहणाचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात मनसेचे वैभव खडेकर, शिंदे गटाचे रामदास कदम, तसेच मंत्री उदय सामंत हे एकाच व्यासपीठावर होते. यावेळी उदय सामंत यांनी काही सूचक विधानं केली होती. हे व्यासपीठ असंच एकत्र राहू दे, असं त्यांनी म्हटलं होतं. तर दुसरीकडे खेडेकर यांचा राजकीय गुरू मीच आहे, असं रामदास कदम यांनी म्हटलं होतं. शिंदे गटातील दोन्ही बड्या नेत्यांच्या या विधानांनंतर आता खेडेकर यांनी फेसबुकवर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षात निष्ठावंतांना कवीडीचीही किंमत नसते, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, खेडेकर यांच्या या फेसबुक पोस्टचे अनेक अर्थ लावले जात आहेत. खेडेकर नाराज आहेत का? असा सवाल केला जातोय. तसेच ते जर नाराज असतील तर आगामी निवडणुका पाहता ते नेमका काय निर्णय घेणार? त्यांच्या मनात असा काही विचार चालू आहे का? असेही विचारले जात आहे. खेडेकर यांच्या या फेसबुक पोस्टनंतर मनसे पक्षाने अधिकृतपणे प्रतिक्रिया दिलेली नाही. खेडेकर नाराज असलेच तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी नेमकं काय करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.