Inside Story: वादग्रस्त अधिकारी प्रवीण जैन यांच्या पदोन्नतीसाठी राष्ट्रवादीची शिफारस!
कथित ६० कोटींच्या उपसूचना भ्रष्टाचार प्रकरणात ‘‘सेल्फ गोल’’ : भाजपावर आरोप करणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सुमारे 60 कोटी रुपयांची बिले नियमबाह्य पद्धतीने अदा केल्याचा आरोप असलेले मुख्य लेखा अधिकारी प्रवीण जैन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या प्रकरणाला आता नवे राजकीय वळण मिळाले असून, प्रवीण जैन यांना अतिरिक्त आयुक्त (1) पदावर नियुक्ती मिळावी यासाठी थेट राष्ट्रवादीच्या सर्वोच्च नेत्यांसह विधानसभा अध्यक्ष व राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांनीही शिफारस झाल्याचे दस्तऐवजांमधून समोर आले आहे.
या प्रकरणात ‘‘भाजपाच्या नगरसेवकांच्या स्वाक्षरी आहेत..’’ असा दावा करीत राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेता भाऊसाहेब भोईर, शहराध्यक्ष तथा नगरसेवक योगेश बहल, नगरसेवक संदीप वाघेरे यांनी सत्ताधारी भाजपाला पत्रकार परिषद घेत ‘टार्गेट’ केले होते. प्रवीण जैन भाजपासाठी काम करीत आहेत, असा अप्रत्यक्ष ‘फेक नॅरेटिव्ह’ करण्याचा प्रयत्न केला जात होता. शिवसेना नगरसेविका सुलभा उबाळे यासुद्धा आघाडीवर होत्या.
मात्र, या वादग्रस्त अधिकाऱ्यासाठी थेट तत्कालीन दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विधानसभा उपाध्यक्ष आण्णा बनसोडे यांनी शिफारस पत्र दिले होते. त्यामुळे जैन यांच्या कथित ६० कोटी रुपयांच्या बोगस उपसूचना प्रकरणात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आमदार अण्णा बनसोडेंचे पत्र उघड
दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून, प्रवीण जैन यांच्या अतिरिक्त आयुक्त (1) पदावरील प्रतिनियुक्तीसाठी शिफारस केल्याचे उघड झाले आहे.या पत्रात आमदार बनसोडे यांनी नमूद केले आहे की, प्रवीण देविचंद जैन हे सध्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे मुख्य वित्त व लेखा अधिकारी तथा संचालक (वित्त) या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत वित्तीय सल्लागार व उपसचिव म्हणून मंत्रालय, मुंबई येथे तीन वर्षे उत्कृष्ट कार्य केले आहे. तसेच, त्यांचे मागील पाच वर्षांचे A.C.R. “उत्कृष्ट” असल्याचेही पत्रात नमूद आहे. या आधारे, प्रवीण जैन यांची तीन वर्षांसाठी प्रतिनियुक्तीने अतिरिक्त आयुक्त (1) पदावर बदलीने नियुक्ती करण्यात यावी, अशी स्पष्ट विनंती आमदारांनी केली आहे.
तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुढील शिफारस
या प्रकरणात आणखी महत्त्वाचा खुलासा म्हणजे, आमदार बनसोडेंचे पत्र मिळाल्यानंतर स्व. अजित पवार यांनीही या नियुक्तीबाबत पुढील स्तरावर शिफारस केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जो अधिकारी भाजपासाठी काम करीत आहे, असा नॅरेटिव्ह करणारे राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी आता तोंडघशी पडले आहेत. कारण, त्यांचे स्थानिक आमदार आणि नेते एका वादग्रस्त अधिकाऱ्याच्या पदोन्नतीसाठी वर्षभरापूर्वी लेखी शिफासर करीत होते, ही बाब उजेडात आली आहे.






