पाणीपुरवठा, MNGL व अमेनिटीज कराबाबत सकारात्मक चर्चा!
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची बैठक

सोसायटी फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे यांची माहिती
पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी
चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने माननीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासोबत विविध प्रलंबित प्रश्नांवर महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महाराष्ट्र नॅचरल गॅस (MNGL), सोसायट्यांचा पाणीपुरवठा, बिल्डरने दिलेल्या हमीपत्राचे उल्लंघन तसेच महानगरपालिकेकडून अमेनिटीजवर लावण्यात आलेल्या अतिरिक्त कराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान फेडरेशनच्या वतीने सोसायट्यांच्या समस्या ठामपणे मांडण्यात आल्या. विशेषतः बिल्डरने पाणीपुरवठा स्वतःच्या खर्चाने करण्याबाबत दिलेल्या हमीपत्राचे पालन न केल्यामुळे संबंधित बिल्डरवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, हमीपत्रानुसार बिल्डरनेच सोसायट्यांना नियमित पाणीपुरवठा करावा, पाण्यासाठी सोसायट्यांनी केलेला खर्च बिल्डरकडून वसूल करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
हेही वाचा
पिंपरी-चिंचवड शहर कोंडीमुक्त करण्यासाठी सक्षम ‘पार्किंग पॉलिसी’ लवकरच; अभिषेक बारणे
याशिवाय ज्या सोसायट्यांमध्ये बिल्डरने ओ.डब्ल्यू.सी. मशीन बसवून दिलेली नाही, त्या संबंधित बिल्डरांवर तसेच अशा गृहप्रकल्पांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. महानगरपालिकेकडून सोसायट्यांच्या अमेनिटीजवर लावण्यात आलेला अतिरिक्त कर चालू आर्थिक वर्षापासून रद्द करावा, हा मुद्दाही फेडरेशनच्या वतीने जोरकसपणे मांडण्यात आला.
या सर्व विषयांवर माननीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित मागण्या मान्य केल्या. बिल्डरविरोधात कारवाई करणे, पाणीपुरवठ्याचा खर्च बिल्डरकडून वसूल करून देणे, बिल्डरमार्फतच पाणीपुरवठा सुनिश्चित करणे तसेच अतिरिक्त अमेनिटीज कर माफ करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी बैठकीत सर्व प्रश्न ठामपणे आणि स्पष्टपणे मांडत सोसायटीधारकांच्या न्याय्य हक्कांसाठी आवाज उठविला.
आयुक्तांच्या मीटिंगमध्ये बिल्डरने हमी पत्राचे उल्लंघन केल्यामुळे बिल्डरवर कारवाई करावी, हमीपत्रानुसार बिल्डरनेच पाणी पुरवावे, ज्या सोसायटीमध्ये बिल्डरने ओ.डब्ल्यू. सी. मशीन बसवून दिलेली नाही त्या बिल्डरवर आणि त्या गृहप्रकल्पाला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी. चालू आर्थिक वर्षापासून सोसायट्यांवरती लावलेला कर रद्द करावा.हे मुद्दे मीटिंगमध्ये ठामपणे आणि स्पष्टपणे मांडले.
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली- -मोशी -चऱ्होली -पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.





